लोकमान्यांचा निधडेपणा, निर्धार आत्मसात करावा

By admin | Published: July 24, 2016 01:05 AM2016-07-24T01:05:34+5:302016-07-24T01:05:34+5:30

महापुरुषांचे केवळ स्मरण करून चालणार नाही. फक्त कुळाचार म्हणून आपण त्यांची आठवण करीत स्वस्थ बसलो तर समाजात अपेक्षित बदल घडून येणार नाही.

The freedoms and determinations of people should be realized | लोकमान्यांचा निधडेपणा, निर्धार आत्मसात करावा

लोकमान्यांचा निधडेपणा, निर्धार आत्मसात करावा

Next

विवेक घळसासी : लोकमान्य टिळक जयंती समारोह
चंद्रपूर : महापुरुषांचे केवळ स्मरण करून चालणार नाही. फक्त कुळाचार म्हणून आपण त्यांची आठवण करीत स्वस्थ बसलो तर समाजात अपेक्षित बदल घडून येणार नाही. त्यासाठी महापुरुषांचे कोणते सुवर्णकण आपल्या व्यक्तिगत जीवनात आपण वेचू शकतो आणि ते आचरणात आणू शकतो, याचा विचार व कृती झाली पाहिजे. लोकमान्य टिळकांकडून त्यांचा निधडेपणा, निर्भयता व निर्धार आत्मसात करायला हवा, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत व जेष्ठ पत्रकार विवेक घळसासी यांनी केले.
लोकमान्य टिळक स्मारक मंडळाच्या वतीने शनिवारी स्थानिक राजीव गांधी कामगार भवन येथे लोकमान्य टिळक जयंती समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘महापुरुषांच्या प्रेरणा व वर्तमान’, या विषयावर आपले विचार मांडताना घळसासी बोलत होते. मंचावर स्मारक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र भागवत, उपाध्यक्ष दत्तप्रसन्न महादाणी उपस्थित होते.
घळसासी पुढे म्हणाले, निर्भयपणा, निर्धार, निधडेपणा या गुणांच्या सहाय्याने त्यांनी समाजासाठी अतुलनीय कार्य केले. त्यांच्या या प्रेरणांचा उपयोग आपण आपल्या वर्तमान जीवनात कसा करू शकतो, याचा विचार करून स्वत:मध्ये परिवर्तन घडविण्याचा निर्धार करावा. जगाच्या पाठीवर अनेक महात्मे जन्माला आले. त्यांनी पृथ्वीवर स्वर्गाचे अवतरण करण्याच्या ध्येयाने काम केले. आज आपण त्या महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी साजरी करून त्यांचे स्मरण करीत आहोत. परंतु या महापुरुषांच्या प्रेरणांचा विचार आपल्या जीवनात कसा होईल, याचा विचार करीत नाही. त्यांनी जीवनात प्रत्येक पावसागणिक संघर्ष केला. आज शिक्षक व पालकांनी भावी पिढीला असेच निर्भय बनण्याचा निर्धार करायला हवा. तेव्हाच समाजात नैतिकता रुजेल, असेही ते म्हणाले.
अ‍ॅड. रवींद्र भागवत म्हणाले की, लोकमान्य टिळक उत्तंग व्यक्तिमत्वाचे धनी होते. या महापुरुषाचे चरण चंद्रपूरला लागले, हे आमचे भाग्य आहे. त्यांच्या नावाने लोकमान्य टिळक स्मारक मंडळ ही संस्था सुरू करण्यात आली असून, त्या माध्यमातून शहरात तीन विद्यालये चालविली जातात. टिळक हे निर्भिड पत्रकार, उत्तम लेखक, तत्ववेत्ते व वाक्पटू होते. त्यांनी आपल्या सर्व गुणांचा उपयोग केवळ राष्ट्रकार्यासाठी केला. लोक त्यांना महाराज व भगवान म्हणत असे. त्यांच्या कार्याची प्रेरणा मिळावी, यासाठी संस्थेतर्फे दरवर्षी व्याख्यानाचे आयोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाची सुरूवात दीप प्रज्ज्वलन, विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेले सरस्वती स्तवन व स्वागत गिताने झाली. यावेळी विवेक घळसासी यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संचालन लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रा. माधवी भट यांनी केले. कार्यक्रमाची सांगता शिक्षिका योगिनी देगमवार यांनी गायिलेल्या वंदेमातरम्ने झाली. याप्रसंगी शहरातील गणमान्य व्यक्ती, लोकमान्य टिळक विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The freedoms and determinations of people should be realized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.