राममंदिरासाठी बल्लारपूरातून महाराष्ट्रातील सागवान काष्ठ अयोध्येसाठी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2023 07:10 PM2023-03-29T19:10:56+5:302023-03-29T19:19:36+5:30

Chandrapur News अयोध्येत राममंदिरासाठी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सागवान काष्ठची निवड करण्यात आली आहे. हे सागवान काष्ठ बल्लारपूरात पूजन करून बल्लारपूर व चंद्रपूरात भव्य शोभायात्रेच्या माध्यमातून अयोध्येच्या दिशेने बुधवारी रवाना करण्यात आले.

From Ballarpur to teak Ayodhya in Maharashtra for Ram Mandir | राममंदिरासाठी बल्लारपूरातून महाराष्ट्रातील सागवान काष्ठ अयोध्येसाठी रवाना

राममंदिरासाठी बल्लारपूरातून महाराष्ट्रातील सागवान काष्ठ अयोध्येसाठी रवाना

googlenewsNext

चंद्रपूर: अयोध्येत राममंदिरासाठी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील सागवान काष्ठची निवड करण्यात आली. हे सागवान काष्ठ बल्लारपूरात पूजन करून बल्लारपूर व चंद्रपुरात भव्य शोभायात्रेच्या माध्यमातून अयोध्येच्या दिशेने बुधवारी रवाना करण्यात आले. दरम्यान, चंद्रपूर आणि बल्लारपूर शहरांना लख्ख दिवे व देखाव्यांनी नववधूसारखे सजविण्यात आले होते. सर्वत्र जयश्रीरामचा जयघोष सुरू होता. एकूणच रामभक्तिमय वातावरणात हे सागवान काष्ठ रवाना करण्यात आले.

१ हजार ८५४ घनपूट चिरान सागवान लाकडाची पहिली खेप रवाना करण्यात आली. यानिमित्त काढण्यात आलेल्या शोभयात्रेसाठी बल्लारपूर व चंद्रपूर शहरात मुख्य मार्गावर स्वागतकमानी, पताका व भगवे झेंडे लावण्यात आले. वर्दळीच्या मुख्य मार्गावर ध्वनिक्षेपकावरून रामधूनने वातावरण राममय झाले होते.

काष्ठ पूजन सोहळ्याला राज्याचे सांस्कृतिक कार्य व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री व पूजन समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्रचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंददेव गिरी, उत्तर प्रदेशचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री योगेंद्र उपाध्याय, स्टॅम्प, न्यायालय शुल्क राज्यमंत्री व बनारसचे पालकमंत्री रवींद्र जायस्वाल व वन पर्यावरण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डाॅ. अरुणकुमार सक्सेना आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. शोभायात्रेत दूरदर्शनच्या रामायण मालिकेतील कलाकार अरूण गोवील, दीपिका, सुनील लहरी यांच्यासह हिंदी, मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मोठे कलाकार सहभागी झाले होते. बल्लारपुरात सायंकाळी ५ वाजता काष्ठ पूजन आणि आरती झाल्यानंतर शोभायात्रेला शहरातून सुरुवात झाली. मान्यवरांनी व नागरिकांनी पूजन केलेल्या काष्ठांवर घराघरांतून पुष्पवृष्टी केली. निर्माणाधिन श्रीराम मंदिरासाठी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातून उत्तम दर्जाचे लाकूड उपलब्ध करून दिल्याबद्दल उत्तर प्रदेशातील तीनही मंत्र्यांनी महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली. शोभायात्रेेचे चंद्रपुरात आगमन झाल्यानंतर भाविकांनी जल्लोषात स्वागत केले. या शोभायात्रेचा समारोप चांदा क्लब ग्राऊंडवर करण्यात आला. या ग्राऊंंडवर प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलाश खेर यांच्या सुमधूर गीतांचा कार्यक्रम आयोजित होता.

महाराष्ट्राच्या लोककलेचे दर्शन

सागवान काष्ठ अयोध्येला पाठविण्यासाठी काढण्यात आलेल्या शोभायात्रेत महाराष्ट्र व उत्तर प्रदेशाचा रथ सहभागी झाला होता. या शोभायात्रेत महाराष्ट्रातील ४३ प्रकारांचे लोककलांचे मनोहरी सादरीकरण करण्यात येत होते. यामध्ये लोककला, रणवाद्य, योग मल्लखांब, दिंडी, लेझीम, आदिवासी कलाप्रकार, ढोलपथके, ध्वजपथके यांचा समावेश होता. स्थानिक एक हजार तर महाराष्ट्रभरातून ११०० असे एकूण २१०० कलाकारांनी हे सादरीकरण केले. एकूणच राम भक्तिमय वातावरणातून महाराष्ट्राच्या लोककलेचे दर्शन घडत होते.


१ हजार वर्षापेक्षा अधिककाळ टिकणार चंद्रपूरचे सागवान लाकूड

सुमारे एक हजार वर्ष श्रीराम मंदिराची वास्तू उभी राहावी. या अनुषंगाने श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला मंदिराच्या महाद्वार, गर्भगृहाचा दरवाजा, मुख्य मंदिर वास्तूतील इतर दरवाजे, यासाठी देशातील सर्वोत्तम सागवान लाकडाची गरज आहे. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेन्द्र मिश्र यांनी उत्तराखंडमधील देहरादून येथील फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्युटशी संपर्क साधल्यानंतर त्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान भारतात सर्वोत्कृष्ट असल्याचे सांगण्यात आले. चंद्रपूर येथील सागवान काष्ठाच्या काही नमुन्यांची ट्रस्टचे अभियंता तथा लार्सन ॲन्ड टुब्रो टीसीईच्या अभियंत्यांनी चाचणी घेतली. चाचणीत हे काष्ठ सर्वोत्तम असल्याचे सिद्ध झाल्यानंतर मंदिर निर्माण समितीने ना. मुनगंटीवार यांच्याकडे पत्राद्वारे फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेडच्या डेपोतून चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान काष्ठ पुरविण्याची मागणी केली. ना. मुनगंटीवार यांनीहे सर्वोत्तम दर्जाचे सागवान काष्ठ अयोध्येला पाठविण्याकरिता पुढाकार घेतला.

Web Title: From Ballarpur to teak Ayodhya in Maharashtra for Ram Mandir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.