दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी मोर्चा
By admin | Published: August 21, 2014 11:46 PM2014-08-21T23:46:52+5:302014-08-21T23:46:52+5:30
शासनाने राज्यातील १२३ तालुके नुकतेच दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले. त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ११ तालुक्याचा समावेश आहे. परंतु ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रह्मपुरी, सावली,
ब्रह्मपुरी : शासनाने राज्यातील १२३ तालुके नुकतेच दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले. त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील ११ तालुक्याचा समावेश आहे. परंतु ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही तालुके वगळण्यात आले आहे. शासनाने पुन्हा विचार करुन तिन्ही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करावे, या मागणीसाठी गुरूवारी भारतीय जनता पार्टीच्यावतीने हजारो शेतकरी, शेतमजूर व कामगारांच्या सहभागात तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी दीपा मुधोळ यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
तालुक्यात अत्यल्प पाऊस पडल्याने बहुतांश भागातील रोवणीची कामे खोळंबली आहेत. मात्र शासनाने चुकीचा निष्कर्ष लावून हे तालुके दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीतून वगळले. यामुळे ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावली तालुक्यातील शेतकरी व शेतमजुरांवरील अन्याय आहे. या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी १९ आॅगस्टला तिन्ही तालुक्यातील जवळपास १०० ते १५० शेतकरी बांधवांनी चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व आपल्या भागाची व्यथा मांडली. परंतु अजूनही शासनाने ठोस भूमिका न उचलल्याने तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. ब्रह्मपुरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा, विजेचे भारनियमन रद्द करा, मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई द्या, एपीएल, बीपीएलधारकांना सणाकरिता साखर उपलब्ध करून द्या, संजय गांधी श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना एक हजार रुपयांचे अनुदान द्या, अतिक्रमणधारकांना वन जमिनीचे पट्टे द्या, मनरेगाअंतर्गत झालेल्या कामांचे मजुरांना त्वरीत वेतन द्या, अशा मागण्या मोर्चाद्वारे करण्यात आल्या. मोर्चात आमदार अतुल देशकर, दीपक उराडे, वंदना शेंडे, नामदेव लांजेवार, क्रिष्णा सहारे, नानाजी तुपट रामलाल दोनाडकर, वसंत वारजुकर, रिता उराडे, योगेश राऊत यांच्यासह हजारोंच्या संख्येने शेतकरी शेतमजूर मोर्चात सहभाग होते. (प्रतिनिधी)