किरकोळ व्यापाºयांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 11:46 PM2017-11-11T23:46:56+5:302017-11-11T23:47:16+5:30
वरोरा नगरपरिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवून शेकडो किरकोळ व्यावसायिकांच्या दुकानावर बेकायदेशीररित्या जे.सी.बी. चालविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : वरोरा नगरपरिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवून शेकडो किरकोळ व्यावसायिकांच्या दुकानावर बेकायदेशीररित्या जे.सी.बी. चालविला. त्यांच्या दुकानाची तोडफोड केली. या विरोधात किरकोळ व्यावसायिकांनी श्रमिक एल्गारच्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात वरोरा नगरपालिकेवर मोर्चा काढला. या मोर्चाच्या माध्यमातून स्ट्रीट वेंडर अॅक्ट २०१४ या कायद्यानुसार किरकोळ व्यावसायिकांना संरक्षण देण्यात यावे, या मागणीचे निवेदन देण्यात आले.
नगरपालिकेसमोर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी अॅड. पारोमिता गोस्वामी म्हणाल्या. वरोरा शहरातील किरकोळ व्यावसायिकांचे व त्यांच्या उपजिविकेचे संरक्षण करण्याकरिता केंद्र सरकारने स्ट्रीट वेंडर अॅक्ट २०१४ लागू केला असून या कायद्यान्वये राज्य सरकारने काही नियम तयार केले आहे. हा कायदा वरोरा नागरपरिषदेलाही लागू आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार जोपर्यंत शहरात नगर विक्रेता समिती तयार होत नाही व या समितीकडून शहरातील किरकोळ व्यावसायिकांचे सर्व्हेक्षण होत नाही, तोपर्यंत कुणालाही रस्त्यावर व्यवसाय करण्यापासून थांबविता येत नाही. असे असताना वरोरा नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमण हटावच्या नावाने किरकोळ व्यावसायिकांची दुकाने जे.सी.बी. लावून तोडण्यात आले. ही बाब कायद्याचा भंग करणारी व गरीब वेंडरवर अन्याय करणारी आहे. याचा जाब विचारण्याकरिता स्ट्रीट वेंडरचा मोर्चा आहे, असे अॅड. गोस्वामी यांनी मोर्चाला संबोधित करताना सांगितले.
किरकोळ व्यावसायिकांच्या दुकानावर बुलडोजर चालविला तर त्यांच्या संसारावर देखील नागर फिरवला असे होते. आज वरोºयात व्होल्टाज, प्रीस्टज, वर्धा पॉवर, जी. एम. आर. सारख्या कंपन्यांतून काढून टाकण्यात आलेले नोकरदार नोकºया न मिळालेले सुशिक्षित बेरोजगार, कुशल-अकुशल कामगार, नापिकी-कर्जबाजारीने त्रस्त शेतकरी आत्महत्या, चोरी, दरोडे, लुटमारी, वाटमारी, अवैध दारूची विक्री करण्याऐवजी रस्त्यावर व्यवसाय करून पोट भरतो हा गुन्हा आहे का?
अनेकांनी आपले दागिने गहान ठेवून, बँकेतून व खासगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेऊन दुकानदारी उभी केली. उधारवाडी करून माल भरला.अशा परिस्थितीत कसाबसा नेटाने संसार चालू असताना पोलिसांची दंडुकेशाही वापरून बळजबरीने बेकायदेशीररित्या आपल्या नगरपरिषदेने किरकोळ व्यावसायिकांवर अन्याय केला आहे. स्ट्रीट वेंडर कायद्यानुसार आमच्या किरकोळ व्यावसायिकांचे संरक्षण झाले पाहिजे. अन्यथा या पुढे अतिशय तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला.
या आंदोलनाला अॅड. पारोमिता गोस्वामी, विजय सिध्दावार, डॉ. मनोज तेलंग, रुपेंद्र तेलंग, आशिष पेटकर, घनश्याम मेश्राम, छाया सिडाम, रवी लोणारे, आनंद गेडाम, रेवती इंगोले, मनिषा लोनगाडगे, संजय नारोळे तथा शेकडो किरकोळ व्यापारी व नागरिक उपस्थित होते.
अवैध दारूविक्रीबाबत पोलिसांना इशारा
बेकायदेशीररित्या अतिक्रमण हटाव मोहिमेकरिता पोलिसांच्या दंडुकेशाहीचा वापर करण्यात आला. पोलिसांनी किरकोळ व्यावसायिकांवर आपल्या बळाचा वापर करण्यापेक्षा, दारूबंदी असतानाही वरोºयात सर्रास अवैध दारूविक्री चिरीमिरी, हप्ते घेऊन सुरु आहे, आपल्या शौर्याचा वापर तिथे करावा आणि बेकायदेशीररित्या नगरपरिषदेने स्ट्रीट वेंडरवर कारवाई केल्यास हा अन्याय सहन करणार नाही, असा सूचक इशारा यावेळी पोलिसांना दिला.
सोमवारी बैठकीचे आयोजन
वरोरा येथील न.प.चे मुख्याधिकारी बल्लाळ हे शासकीय कामानिमित्त मुंबई येथे गेल्याने निवेदन कार्यालयीन अधीक्षक डॉ. कोटेजा यांनी स्वीकारले. त्यामुळे वेंडर अॅक्टबाबत सविस्तर चर्चा करण्याकरिता सोमवारला श्रमिक एल्गार संघटनेचे पदाधिकारी, किरकोळ व्यावसायिकांचे प्रतिनिधी व मुख्याधिकारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून तसे लिखित पत्र यावेळी शिष्टमंडळाला देण्यात आले.