महापौर निवडीसाठी मोर्चेबांधणी
By admin | Published: October 20, 2014 11:08 PM2014-10-20T23:08:49+5:302014-10-20T23:08:49+5:30
चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी ३० आॅक्टोबरला निवडणूक होणार आहे. आतापर्यंत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. आता मात्र नगरसेवकांनी महापौर व उपमहापौर
विधानसभा संपली : आता नगरसेवकांची रणधुमाळी
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी ३० आॅक्टोबरला निवडणूक होणार आहे. आतापर्यंत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. आता मात्र नगरसेवकांनी महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यावेळीही महापौर पद महिला खुल्या प्रवर्गासाठी राखीव असल्याने पुन्हा महिला महापौरच चंद्रपूर नगरचा कारभार सांभाळणार आहेत.
२०१२ मध्ये चंद्रपूर महानगरपालिकेवर शिवसेनेच्या युतीसोबत काँग्रेसची सत्ता स्थापन झाल्यानंतर प्रथम महापौर म्हणून संगिता अमृतकर यांची वर्णी लागली. उपमहापौरपदी शिवसेनेचे संदीप आवारी विराजमान झाले. त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ या महिन्यात संपत आहे. त्यामुळे आता नवीन महापौर निवडून देणे गरजेचे आहे. महापौर पदाच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी ३० आॅक्टोबरला सकाळी ११ वाजता गांधी चौकातील महापालिकेच्या नवीन इमारतीतील सभागृहात विशेष बैठक बोलाविली आहे. त्यासंबंधीच्या पत्रवजा सूचना सर्व नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत. यात निवडणूक कार्यक्रमाची माहितीही देण्यात आली आहे.
आॅक्टोबर महिना यावेळी निवडणुकांनीच गाजत आहे. १५ आॅक्टोबरपर्यंत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती. सर्व राजकीय पक्षांनी आपला स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरविल्याने राजकीय पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रचारात गुंतला होता. १९ आॅक्टोबरला विधानसभेचा निकालही हाती आला. आता महानगरपालिकेतील महापौर पदाच्या निवडणुकीचा ज्वर चढू लागला आहे. नगरसेवकांच्या बैठका रंगात येऊ लागल्या आहेत. चंद्रपूर महानगरपालिकेत सध्या काँग्रेसच्या महापौर असल्या तरी सद्यस्थितीत काँग्रेसमध्ये गटबाजी कायम आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही ही गटबाजी संपुष्टात आल्याचे दिसून आले नाही. महिला खुल्या प्रवर्गासाठी महापौर पद राखीव असल्याने यावेळीदेखील पुरुष नगरसेवकांना संधी नाही. काँग्रेसमध्ये संगीता अमृतकरसह सुनीता अग्रवाल, राखी कंचर्लावार, सुनीता लोढिया, शिल्पा आंबेकर आदी महिला नगरसेवक आहेत. मागील निवडणुकीत माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक झाली होती. त्यानंतर एका प्रकरणात पुगलिया व महापौर संगिता अमृतकर, स्थायी समिती सभापती रामू तिवारी, गटनेता संतोष लहामगे यांच्यात मतभेद झाले. त्यामुळे आता मोर्चेबांधणीसाठी दोन्ही गटांकडून वेगळवेगळी मोर्चेबांंधणी केली जात आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीकडे भाजपाचे नगरसेवकही गांभीर्याने लक्ष देऊन आहेत. (शहर प्रतिनिधी)