बँकांकडून कर्ज मिळत नसल्याने निराशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:55 AM2020-12-04T04:55:16+5:302020-12-04T04:55:16+5:30
पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे भरा सिंदेवाही : पशुधन विकासाला चालना देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र, विविध पदे ...
पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे भरा
सिंदेवाही : पशुधन विकासाला चालना देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. मात्र, विविध पदे रिक्त असल्याने विकासाच्या योजना शेतकºयांपर्यंत पोहोचत नाही. पंचायत समिती स्तरावर सुधारीत आकृती बंधानुसार अनेक पदांना मंजुरी मिळाली आहे. पण, पदे भरण्यात आली नाहीत. योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी वर्ग ३ च्या पशुधन पर्यवेक्षकांची नियुक्ती करावी, अशी मागणी आहे.
रस्त्यांवरील झुडपे ठरत आहेत जीवघेणे
सावली : ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेल्या झुडपांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तालुक्यातील व्याहाड, अंतरगाव, मुडझा रस्ता, निफंद्रा, डोंगरगाव, बोरखळा, कसरगाव, करोली, निफंद्रा, मंगरमेंढा बारसागड, मेहा, गेवरा, सायखेडा, पालेबारसा, विरखल चक, हिरापूर अंतरगाव ते मेहा रस्त्यांवर दोन्ही बाजूला मोठी झुडपे वाढली आहेत. काही मार्गांवर अपघातही झाले. याबाबत बांधकाम विभागाला कळविण्यात आले. अपघात टाळण्यासाठी रस्त्यांवरील झुडपे तोडण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा
गडचांदूर : शहरातील डुकरे व मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावर मोकाट जनावरे उभी राहत असल्याने मार्ग काढण्यास अडचणी येतात. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला. मोकाट कुत्रे दुचाकीस्वारांच्या मागे धावतात. रात्रीच्या सुमारास घराबाहेर निघणे कठीण झाले. नगरपरिषदने मोकाट जनावरे व डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली.
मानव मिशन योजनेची
व्याप्ती वाढवा
भद्रावती : आर्थिकदृष्ट्या गरीब विद्यार्थिनींनी बसद्वारे शाळेत जाता यावे, याकरिता मानव मिशन योजना सुरू करण्यात आली. मात्र शाळा सुरु होवूनही अद्यापही महामंडळाने बसफेऱ्या सुरु केल्या नाही. त्यामुळे विद्यार्थिनींना अडचणींना सामोर जावे लागत आहे. शिवाय, विद्यार्थिनींनी सायकलसाठी तीन हजार रुपयांची मदत मिळते. मात्र ही मदत तोकडी असल्याने मदत वाढवावी, अशी मागणी होत आहे.
पीक विम्याची रक्कम
केव्हा मिळणार ?
सिंदेवाही : तालुक्यातील शेकडो कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. पण, विम्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. अल्प पावसामुळे खरीप हंगामातील धानाचे पीक वाया गेले होते. उत्पन्नात कमालीची घट झाल्याने शेतकरी विम्याची रक्कम केव्हा मिळेल, असा प्रश्न विचारत आहेत. प्रशासनाने विम्याची रक्कम तातडीने द्यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.
प्रवाशी निवाऱ्याची दैनावस्था
धाबा : धाबा ते पोेडसा प्रमुख मार्गावर असलेल्या हिवरा बसस्थानकाची मोठी दुर्दशा झाली आहे. प्रवाश्यांना त्रास होत आहे. त्यामुळे निवाऱ्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
कापूस उत्पादकांच्या
समस्या सोडवा
राजुरा : तालुक्यात कापसाची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु, यंदा अल्प पावसामुळे पिके वाया गेली. शिवाय, बोंड अळीने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने सर्वेक्षण केले. मात्र, शेतकºयांना अद्याप भरपाई दिली नाही. यातून गरीब शेतकरी बळी पडण्याची शक्यता आहे. काही शेतकऱ्यांच्या कापसाचे चुकारे मिळाले नाहीत. जिल्हा प्रशासनाने चौकशी करून कापूस उत्पादकांना मदत करण्याची मागणी होत आहे.
आवश्यक गतिरोधक मनपा उदासीन
चंद्रपूर : येथील कस्तुरबा मार्गावरील ज्युबिली हॉयस्कूलजवळ गतिरोधक नसल्याने अपघात होत आहेत. या रस्त्यावर एकही गतिरोधक नाही. त्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर गतिरोधक तयार करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
रुग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य
चंद्रपूर : जिल्हा सामान्य रुग्णालयासमोरील फुटपाथवर घाणीचे साम्राज्य पसरले असून दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत नागरिकांनी वारंवार वरिष्ठांचे लक्ष वेधले. मनपाचेही लक्ष वेधले. मात्र कुणीही लक्ष दिले नाही. आतातरी वरिष्ठांनी याकडे लक्ष द्यावे.
बाबुपेठमधील अनेक भागात अंधाराचे साम्राज्य
चंद्रपूर : बाबुपेठ परिसरातील अनेक भागात असलेले पथदिवे बंद राहतात. त्यामुळे या परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. येथील नागरिकांनी अनेकदा याबाबत तक्रार केली. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष देऊन समस्या सोडवावी, अशी मागणी आहे.