‘त्या’ मतदारांच्या नखावर टिंबाऐवजी लावणार पूर्ण शाई; दोन्ही राज्यांत मतदान करू नये म्हणून उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 05:42 AM2024-04-17T05:42:53+5:302024-04-17T05:43:07+5:30
महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवरील वादग्रस्त १४ गावांत पाच हजारांपेक्षा अधिक मतदार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवरील वादग्रस्त १४ गावांत पाच हजारांपेक्षा अधिक मतदार आहेत. मतदारांनी दोन्ही राज्यात मतदान करू नये म्हणून मतदान केल्यावर डाव्या हाताच्या एका बोटावर नेहमीप्रमाणे केवळ टिंब न लावता त्या नखावर पूर्ण काळी शाई लावण्यात येईल, अशी माहिती चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी मंगळवारी ‘लोकमत’ला दिली. चंद्रपूर मतदारसंघात १८ एप्रिलला तर तेलंगणामधील आसिफाबाद मतदारसंघात १३ मे रोजी मतदान आहे.
असे आहेत मतदार
- महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील १४ गावांत २,६९४ पुरुष तर २,४२३ महिला असे एकूण ५,११७ मतदार आहेत.
- यात पुडियालमोहदा मतदान केंद्रांतर्गत एकूण ७२२, कुंभेझरी १,४३५, भोलापठार ८३१, वणी (खु.) ६१२, महाराजगुडा ०१ आणि परमडोली केंद्रावर १,२१६ मतदार आहेत.
ती १४ गावे कोणती?
महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील अंतापूर, पद्मावती, इंदिरानगर, पळसगुडा, येसापूर, भेलापठार, लेंडीगुडा, येसापूर (नारायणगुडा), शंकरलोधी, महाराजगुडा, कोठा (बु.), परमडोली, मुकदमगुडा आणि लेंडीजाळा ही चौदा गावे असून या गावांवर दोन्ही राज्यांनी हक्क सांगितला आहे. न्यायालयाने ही गावे महाराष्ट्रात असल्याचे शिक्कामोर्तब केले आहे. या गावातील ग्रामस्थांकडे तेलंगणा राज्यातील आधारकार्ड, रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र असल्याने ते तेथे जाऊन मतदान करण्याची शक्यता आहे. यापूर्वी त्यांनी दोन्ही राज्यात मतदानाचा हक्क बजावला आहे.