रेल्वे स्थानक मार्गाच्या डांबरीकरणासाठी निधी दया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:28 AM2021-03-05T04:28:36+5:302021-03-05T04:28:36+5:30
खासदारांना दिले निवेदन मूल: कोरोना संसर्गामुळे रेल्वे काही काळासाठी बंद आहे, दरम्यान रेल्वे स्थानकाकडे जाणारा मार्ग खड्डेमय असल्यामुळे नागरिकांना ...
खासदारांना दिले निवेदन
मूल: कोरोना संसर्गामुळे रेल्वे काही काळासाठी बंद आहे, दरम्यान रेल्वे स्थानकाकडे जाणारा मार्ग खड्डेमय असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे बंद काळात रस्त्याची दुरूस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा आणि तात्काळ रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी मूल नगर पालिकेच्या सदस्य ललिता फुलझेले यांनी क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर यांच्याकडे केली आहे.
मूल येथील रेल्वे स्थानकाकडे जाणारा मुख्य रस्ता पूर्णपणे खड्डेमय झालेला आहे. या मार्गावर अनेकदा डागडुजीचे काम करण्यात आले. मात्र काही दिवसातच रस्ता उखडून गेल्याने या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ऑटोने जाणाऱ्या प्रवाशानाही आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. सध्या कोरोना संक्रमणामुळे रेल्वे बंद आहे. परंतु सायंकाळी फिरणारे नागरुिक या मार्गावरून मोठया प्रमाणावर ये-जा करीत असतात. यामुळे या मार्गाच्या डांबरीकरणासाठी निधी उपलब्ध करून, तात्काळ रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका ललिता फुलझेले यांनी केली आहे. यावेळी काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर, जिल्हा उपाध्यक्ष राकेश रत्नावार, महिला काॅंग्रेसच्या तालुकाध्यक्ष रूपाली संतोषवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अखिल गांगरेड्डीवार उपस्थित होते.