विसापूर येथील नाला बांधकामाला निधीचा अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:30 AM2021-09-26T04:30:20+5:302021-09-26T04:30:20+5:30
विसापूर : बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलकडून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून येते. त्याचप्रमाणे गावातील सांडपाणी जाण्यासाठी नाला बांधकाम केले नाही. ...
विसापूर : बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलकडून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून येते. त्याचप्रमाणे गावातील सांडपाणी जाण्यासाठी नाला बांधकाम केले नाही. यामुळे येथील वाॅर्ड क्रमांक पाचमधील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या कामाला मोठा निधी लागेल, त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ग्रामपंचायतीने म्हटले आहे. दुसरीकडे ग्रामपंचायतीने तातडीने नाला बांधकाम करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. या मागणीचे निवेदन ग्रामपंचायत उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांना दिले आहे.
विसापूर गावाच्या हद्दीत बाटनिकल गार्डन व तालुका क्रीडा संकुल आवारभिंत बांधण्यात आली. त्या भागातील पाण्याचा प्रवाह सुरेश कौरासे यांच्या घरापासून रेल्वे लाईन पुलाकडे जातो. त्याच मार्गाने गावातील सांडपाणी देखील वाहत असते. या मार्गादरम्यान अनेक ठिकाणी खाचखळगे पडले आहेत. परिणामी पावसाचे पाणी व गावातील सांडपाणी साचून राहते. यामुळे या भागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
विसापूर येथील वाॅर्ड क्रमांक पाचमधील नागरिकांनी ही समस्या सोडवा म्हणून अनेकदा ग्रामपंचायतला निवेदन दिले. मात्र, अद्याप समस्या निवारण झाले नाही. परिणामी नागरिकांत असंतोष निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने या वाॅर्डातील समस्याचे गांभीर्य ओळखून तातडीने नाला बांधकाम करावे, अन्यथा उपसरपंच अनेकश्वर मेश्राम यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा महादेव देवतळे व मंगेश जुनघरे यांनी दिला आहे.
बॉक्स
विसापूर वाॅर्ड क्रमांक पाचमधील नाला बांधकामाची समस्या आहे. ही समस्या सोडविण्यासाठी ग्रामपंचायतीने मासिक सभेत ठराव पारित केला आहे. नागरिकांच्या समस्येचे निवारण व्हावे म्हणून आमदार सुधीर मुनगंटीवार यांना व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्र पूर्वीच दिले आहे. हा नाला बांधकामाचा खर्च मोठा आहे. ग्रामपंचायत पातळीवर हा खर्च झेपणारा नाही. आमदार व खासदार निधीतून नाला बांधकाम करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत करत आहे.
- अनेकश्वर मेश्राम
उपसरपंच, ग्रामपंचायत, विसापूर.
250921\screenshot_2021-09-25-15-18-23-57.png
विसापूर येथील नाला बांधकाम तातडीने करा