वर्धा नदीवरील धानोरा, आमडी व आर्वी-धानूर बॅरेजसाठी निधी द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 10:10 PM2019-01-11T22:10:45+5:302019-01-11T22:11:16+5:30
जिल्ह्यातील वर्धा नदीवरील धानोरा, आमडी व आर्वी-धानुर या तीन बॅरेजच्या स्थळी ७.५० मीटरपेक्षा जास्त खोलीवर कठीण भूस्तर उपलब्ध होत असल्यामुळे सर्वेक्षण, अन्वेषण, संकल्पन व सविस्तर प्रकल्प अहवाल वॉप्कोस या संस्थेकडून करून घेण्यासाठी मान्यता देण्याचा ठराव विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत पारित करण्यात आला आहे. सदर तिन्ही बॅरेजेसच्या कामासाठी निधी उपलब्ध करवून देण्याची मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
चंद्रपूर : जिल्ह्यातील वर्धा नदीवरील धानोरा, आमडी व आर्वी-धानुर या तीन बॅरेजच्या स्थळी ७.५० मीटरपेक्षा जास्त खोलीवर कठीण भूस्तर उपलब्ध होत असल्यामुळे सर्वेक्षण, अन्वेषण, संकल्पन व सविस्तर प्रकल्प अहवाल वॉप्कोस या संस्थेकडून करून घेण्यासाठी मान्यता देण्याचा ठराव विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत पारित करण्यात आला आहे. सदर तिन्ही बॅरेजेसच्या कामासाठी निधी उपलब्ध करवून देण्याची मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय जलसंसाधन मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्लीत भेट घेतली व मागणीचे निवेदन सादर केले.
आमडी, आर्वी धानुर, धानोरा हे तिन्ही बॅरेजेस अतिशय महत्त्वाचे बॅरेजेस आहेत. धानोरा बॅरेजमधून चंद्रपूर शहरास पिण्याकरिता २५ दलघमी, औद्योगिक क्षेत्राकरिता ४४.५६ दलघमी पाण्याचे नियोजन आहे. तसेच आमडी बॅरेजमधून बल्लारपूर, राजुरा व चंद्रपूर शहरासाठी पिण्याच्या पाण्याकरिता ३० दलघमी, औद्योगिक क्षेत्राकरिता २४.१७ दलघमी पाण्याचे नियोजन आहे. सदर बॅरेजस करिता वनजमिनीची आवश्यकता नाही.
आमडी बॅरेजचे सिंचन क्षेत्र २८९० हेक्टर, आर्वी धानुर बॅरेजची सिंचन क्षेत्र ४०२१ हेक्टर तर धानोरा बॅरेजचे सिंचन क्षेत्र ४३४१ हेक्टर इतके आहे. आमडी बॅरेजची अंदाजित किंमत २१७ कोटी, आर्वी धानुर बॅरेजची अंदाजित किंमत १६४.५० कोटी तर धानोरा बॅरेजची अंदाजित किंमत ३२८.११ कोटी इतकी आहे. सदर बॅरेजसाठी आवश्यक निधी त्वरीत उपलब्ध करण्यात यावा, अशी मागणी या चर्चेदरम्यान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. सदर मागणी तपासून याबाबत त्वरीत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले.
मान्यतेसाठी नियामक मंडळाच्या बैठकीत ठराव पारित
गुरुवार दि. १० जानेवारी रोजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली व वरील विषयाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी ना. मुनगंटीवार म्हणाले, तीन बॅरेजेसच्या कामासंदर्भात सर्वेक्षण, अन्वेषण, संकल्पन व सविस्तर प्रकल्प अहवाल वॉप्कोस या संस्थेकडून करून घेण्यासाठी मान्यता मिळण्याच्या दृष्टीने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूरच्या नियामक मंडळाच्या ७१ व्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला आहे.