मूल शहर विकासाला निधी कमी पडू देणार नाही
By admin | Published: January 9, 2016 01:24 AM2016-01-09T01:24:27+5:302016-01-09T01:24:27+5:30
मूल शहर विकास परिषदेत दिलेल्या आश्वासनाची पुर्तता येत्या काही दिवसात होणार असून त्यांचे नियोजन विविध ...
सुधीर मुनगंटीवार : नगर पालिका पदाधिकाऱ्यांत नियोजन नसल्याने नाराजी
मूल : मूल शहर विकास परिषदेत दिलेल्या आश्वासनाची पुर्तता येत्या काही दिवसात होणार असून त्यांचे नियोजन विविध विभागांना दिले आहे. विकासाबरोबरच बेरोजगारांना रोजगार देण्याचा प्रयत्न ‘टाटा ट्रस्ट’च्या माध्यमातून केला जाणार आहे. मूल शहराच्या विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही. मात्र पालिका पदाधिकाऱ्यात मूल शहर विकासाचे नियोजन नसल्याचा ठपका ठेवत नाराजीचा सूर राज्याचे अर्थमंत्री तथा पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील तसेच मूल शहरात होत असलेल्या सिमेंट रस्त्याला करोडो रुपयाचा निधी दिला आहे. मूल शहरातील सर्वच रस्ते सिमेंट क्राँक्रीटने बनविण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे. बायपास वळण रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असून शहरातील वाहनाची कोंडी कमी होण्यास मदत होईल. चंद्रपूर-गडचिरोली महामार्ग राष्ट्रीय महामार्ग झाल्याने मूल शहराला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. शहरातील तलावात सौंदर्यीकरण केले जाणार असून मासेमारी व शेतकऱ्यांच्या पिकांसाठी पाणी कुठल्याही परिस्थितीत कमी होणार नाही. याबाबत सिंचाई विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतल्यानंतरच निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रपूर येथे असलेल्या प्रियदर्शनी सभागृहाप्रमाणे मूल शहरात स्व.मा.सा. कन्नमवार या नावाने सभागृह अस्तित्वात येणार असून यात सर्व सुविधांचा समावेश असेल. गरीब व होतकरु स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करण्यासाठी श्याम मुखर्जी वाचनालय अस्तित्वात येणार आहे. बसस्थानकाचे नुतनीकरण केले जाणार असून अद्यावत स्वरुपाचे बसस्थानक बनणार आहे.
तहसील कार्यालयाची प्रशासकीय इमारत तसेच पंचायत समितीची इमारत देखील नव्या स्वरुपात दिसणार आहे. मूल शहरात ९.९७ कोटी रुपयाची विद्युत व्यवस्था साकारली जाणार असून त्यात सौंदर्यीकरण वाढणार आहे. वनविभागाच्या ६० एकर जागेत वृक्षारोपण व बगीचाची निर्मिती केली जाणार आहे. शहर विकासाबरोबरच बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी ‘टाटा ट्रस्ट’च्या माध्यमातून रोजगाराचा प्रश्न निकाली काढला जाणार आहे. यासंदर्भात अंतिम टप्प्यात काम आले असल्याचे त्यांनी सांगितले.
मूल शहराच्या विकासाला चालना देऊन विविध विकास कामे गेल्या अनेक वर्षात झाले नसतील ती कामे केली जाणार आहे. यासाठी न.प. पदाधिकाऱ्यांचे नियोजन नसल्याची खंत व्यक्त केली. त्यामुळे स्व. मा.सा. कन्नमवार सभागृह पुर्णत्वास आल्यावर त्याची देखभाल करण्याची जबाबदारी तहसील कार्यालयावर देण्यात येईल असेही ते म्हणाले. नागरिकांनी विविध विकासात्मक बाबीसाठी नाविण्यपूर्ण सुचविल्यास विकासात्मक कार्यात भर घालता येईल, असेही ना. मुनगंटीवार यांनी मत व्यक्त केले. (तालुका प्रतिनिधी)