लोकवर्गणीतून झाले अनाथ तरूणावर अंत्यसंस्कार
By admin | Published: October 26, 2015 01:11 AM2015-10-26T01:11:11+5:302015-10-26T01:11:11+5:30
बालपणी वडिलाचे छत्र हरपले, आई वेडी झाली. मोठी बहीण भावंडाचा सांभाळ मोलमजुरीची कामे करून कुुटुंबाचा गाडा हाकत असताना एका अपंग भावाची काळजी धाकटी बहीण घेत होती.
विसापूरकरांची सामाजिक बांधिलकी : अनेकांनी दिला मदतीचा हात
अनेकश्वर मेश्राम बल्लारपूर
बालपणी वडिलाचे छत्र हरपले, आई वेडी झाली. मोठी बहीण भावंडाचा सांभाळ मोलमजुरीची कामे करून कुुटुंबाचा गाडा हाकत असताना एका अपंग भावाची काळजी धाकटी बहीण घेत होती. घरातील परिस्थिती अत्यंत हलाकीची, अपंग असलेल्या भावाचे रविवारी अकाली निधन झाले. अंत्यसंस्काराचा सोपस्कार पार पाडण्यासाठी अडचण निर्माण झाली. अशातच विसापूरकरांची सामाजिक बांधीलकी कामी आली. अनेकांनी मदतीचा हात पुढे करून अनाथ तरुणावर लोकवर्गणीतून अंत्यसंस्कार केले.
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील विवेक पांडुरंग पुणेकर (३०) असे या तरुणाचे नाव असून त्याच्या अंत्यसंस्काराला सामाजिक बांधीलकीच्या माध्यमातून लोकवर्गणीच्या रूपाने आपुलकीची झालर मिळाली. विसापुरात एकेकाळी पांडुरंग पुणेकर यांच्याकडे किराणा दुकान होते. पत्नी सरीता त्यांच्या व्यवसायात हातभार लावत होती.
सुखी व संपन्न कुुटुंबाचा वारसा त्यांना लाभला होता. मात्र नियतीचे चक्र उलटे फिरले. पत्नी सरिताला वेडेपणाच्या आजाराने ग्रासले, त्यांच्या कुटुंबाची परवड सुरू झाली. यातून त्यांना सावरता आलेच नाही. पत्नीच्या आजारपणाचा खर्च वाढला. दारिद्र्याने त्याचा पाठलाग केला. अखेर संसाराचा गाडा पुढे नेताना दारिद्र्यातच पांडुरंगचा मृत्यु झाला. अशातच कुटुंबाचा भार मुलगी रंजनावर आला. हलाकीच्या परिस्थितीतही त्या कुटुंबाचा जीवन प्रवास सुरू होता. तीन भाऊ व एक बहिण आणि वेडी आई अशा कुटुंबाला दारिद्र्याच्या चक्रव्यूहाने ग्रासले होते. मात्र रंजना कुटुंबासाठी प्रामाणिकपणे मार्गक्रमण करीत होती. एका भावाचे मध्यंतरी निधन झाले आणि रविवारी त्यातील विवेकचा जीवन प्रवास थांबला.
विवेकच्या अंत्यसंस्कारासाठी ग्रामपंचायतीचे लिपीक राजू पुणेकर, किरणकुमार पुणेकर, सुमेध शेंडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी लोक वर्गणीचा मार्ग निवडला. अनेकांनी मदतीचा हात पुढे करून सामाजिक कर्तव्याचा परिचय दिला. पाहता पाहता मायेची ऊब जागृत झाली.
अंत्यसंस्काराला लागणाऱ्या साहित्यांची जमवाजमव करून आईवडीलाविना पोरका असलेल्या विवेक नावाच्या तरुणावर विसापूर येथील स्मशानभूमीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गरीब, अनाथ व कमकुवत घटकातील व्यक्तींना येथील नागरिकांनी यापूर्वी अनेकदा मदतीचा हात दिला, त्याची पुर्नरावृत्ती आजही दिसून आली.