सामान्य प्रशासन विभागावर रोष
By admin | Published: June 22, 2017 12:40 AM2017-06-22T00:40:19+5:302017-06-22T00:40:19+5:30
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची मंगळवारी सभा पार पडली. या सभेत नवनियुक्त अनेक सदस्यांनी डायरीचा मुद्दा उपस्थित करून सामान्य प्रशासन विभागावर रोष व्यक्त केला.
जि.प.ची स्थायी सभा : डायरी डावलून केली दिनदर्शिका प्रकाशित
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची मंगळवारी सभा पार पडली. या सभेत नवनियुक्त अनेक सदस्यांनी डायरीचा मुद्दा उपस्थित करून सामान्य प्रशासन विभागावर रोष व्यक्त केला.
जिल्हा परिषदेचे अधिकारी, त्यांच्या अधिनस्त असलेले कर्मचारी, त्यांचे संपर्क क्रमांक असलेली डायरी दरवर्षी प्रकाशित केली जाते. यंदा मात्र डायरी डावलून दिनदिर्शिका प्रकाशित करण्यात आली. ही दिनदर्शिका विनापरवानगीने सामान्य प्रशासन विभागाने प्रकाशित केली, असा आरोप स्थायी समितीच्या काही सदस्यांनी केली. या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी सभेत लावून धरली. जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात दैनंदिन डायरी छपाईसाठी एक लाख रुपयांची तरतूद आहे. सर्व विभागप्रमुखांसह अन्य शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक व दूरध्वनी क्रमांक या डारीमध्ये असते. आवश्यक माहितीसाठी ही डायरी अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांना उपयुक्त ठरते.
डायरी छपाईचे कामकाज सामान्य प्रशासन विभागातर्फे केले जाते. फेब्रुवारी महिन्यात जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडली. यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. ५६ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बहुतांश सदस्य नवीन आहेत. मात्र त्यांच्याकडे अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांचे संपर्क क्रमांक नाहीत. त्यामुळे कामकाजात त्यांना अडचणी येत आहे. त्यांनी सामान्य प्रशासन विभागाकडे डायरीची मागणी केली होती. मात्र, डायरीऐवजी दिनदर्शिका छपाई करण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळेच हा मुद्दा स्थायी समितीच्या सभेत गाजला.
तेव्हा अध्यक्षांनी दिनदर्शिकेपेक्षा डायरी महत्त्वाची असून डायरी तातडीने छपाई करण्याचे निर्देश दिले. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यात वैयक्तिक स्वच्छतागृहाचे बांधकाम करण्यात आले. परंतु अद्याप लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाही. हाही मुद्दा सभेत गाजला.