नगरपंचायतींच्या 303 उमेदवारांचे भवितव्य मशीनबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 05:00 AM2021-12-22T05:00:00+5:302021-12-22T05:00:26+5:30
प्रचारतोफा थंडावल्यानंतरही उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी भेटी घेऊन प्रचार केला होता. सिंदेवाही-लोणवाही, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती नगरपंचायतीच्या ८२ जागांसाठी ३०३ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण ८२ प्रभागांत ९४ मतदान केंद्रांमध्ये सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत ६७ टक्के मतदान झाले. अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सिंदेवाही-लोणवाही, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना व जिवती नगरपंचायतींमधील एकूण ८२ जागांसाठी निवडणूक लढविणाऱ्या ३०३ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मंगळवारी सायंकाळी ५. ३० वाजता ईव्हीएम मशीनबंद झाले. या निवडणुकीत ७९.१९ टक्के मतदान झाले. ३७ हजार ४५९ मतदारांपैकी २८ हजार ५४३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ओबीसी प्रभागातील खुल्या झालेल्या २० जागांची निवडणूक झाल्यानंतर १९ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीदरम्यान कुठेही अनुचित घटना घडली नाही.
सिंदेवाही-लोणवाही, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना व जिवती नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेनासह सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. लवकरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होणार असल्याने साऱ्याच पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. प्रचारतोफा थंडावल्यानंतरही उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी भेटी घेऊन प्रचार केला होता. सिंदेवाही-लोणवाही, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती नगरपंचायतीच्या ८२ जागांसाठी ३०३ उमेदवार रिंगणात आहेत. एकूण ८२ प्रभागांत ९४ मतदान केंद्रांमध्ये सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत ६७ टक्के मतदान झाले. अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.
सिंदेवाहीत दुपारनंतर मतदान केंद्रात गर्दी
सिंदेवाही : सिंदेवाही नगर पंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळपासून कोणतेही गालबोट न लागता शांततेत मतदान पार पडले. एकूण ७५.९९ टक्के मतदान झाले. १४ प्रभागात ६६ उमेदवार उभे आहेत. सकाळी मतदानासाठी फारसे नागरिक आले नाही. सायंकाळी मात्र मतदानासाठी नागरिकांची केंद्रावर गर्दी झाली. सिंदेवाही-लोनवाही निवडणुकीत काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, वंचित आघाडी, बीएसपी, आम आदमी पार्टी, अपक्ष पक्षांनी निवडणूक लढविली. शहरात सकाळपासूनच पालकमंत्री विजय वडेट्टीवार तसेच आमदार बंटी भांगडिया प्रामुख्याने उपस्थित होते. पोलीस विभागाचा तगडा बंदोबस्त होता.
जिवतीत नगरपंचायतमधील १३ प्रभागाच्या १३ केंद्रांवर २ हजार ३७४ जणांचे मतदान
जिवती : स्थानीक नगरपंचायत निवडणुकीतील आज झालेल्या १७ पैकी १३ प्रभागात निवडणुक पार पडली, त्यात उभ्या असलेल्या उमेदवाराचीही धाकधूक वाढत निवडणुकीची सांगता झाली. जिवती नगर पंचायत येथिल मतदान पार पडली. ३१६३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावत १३ प्रभागातील उभ्या असलेल्या ३४ उमेदवारांसाठी निवडणूक शांततेत पार पडली पण यात अनेक मतदार हे कर्मचारी असून त्यांची बदली होऊन बाहेर गावी गेलेला अवधी पाच वर्षाचा झाला अशाही लोकांना उमेदवारांनी बोलाऊन आज निवडणुकीत एक वेगळाच रंग भरला. परंतू शहरातील आजची निवडणूक शांततेत पार पडली हे विशेष आहे. जिल्ह्यातील छोट्याशा शहरात झालेल्या नगरंचायतीच्या निवडणुकीला कोणतेही गालबोट न लागता व्यवस्थित पार पडली.
गोंडपिपरी येथे शांततेत मतदान
गोंडपिपरी : येथील नगरपंचायतीच्या १४ प्रभागांतील ६९ उमेदवारांचे भाग्य आज मशीन बंद झाले . मतदानादरम्यान कुठेही अनुचित घटना घडली नाही. मागील निवडणुकीपेक्षा यंदा सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांचा जोरदार प्रचार केल्याचे दिसून आले. मतदान केंद्राच्या काही अंतरावर मतदार याद्या व स्टॉल उपलब्ध करण्यात आले होते. मागील निवडणुकीतील झालेली गैरसोय यंदा टळली.
नागरिकांना आता निकालाची प्रतीक्षा
पोंभूर्णा : नगरपंचायतची निवडणूक मंगळवारी शांततेत पार पडली. १३ प्रभागासाठी ३ हजार ९ मतदारांनी आपला हक्क बजावला. दुपारी ३ वाजतानंतर मतदानासाठी केंद्रांत माेठी गर्दी झाली होती. ८०.२० टक्के मतदान झाले आहे. उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. निवडणुकीमुळे आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला होता. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने ७ अधिकारी व १५० पोलीस कर्मचारी तैनात केले होते.
सावलीत तगडा पोलीस बंदोबस्त
सावली : नगरपंचायतीत १७ जागांसाठी आज शांततेत मतदान झाले. ४५ उमेदवार राजकीय भवितव्य अजमावत आहेत. निवडणुकीसाठी १४ मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. यावेळच्या निवडणुकीत काँग्रेस व भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. प्रचारासाठी प्रत्येक प्रभागात सभा लावल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती. त्यामुळे सावलीत तगडा पोलीस बंदोबस्त होता. आता सर्वांचे लक्ष मतमाेजणीकडे लागले आहे.
कोरपनात २ हजार ९९६ जणांनी केले मतदान
कोरपना : कोरपना नगरपंचायतची दुसरी सार्वत्रिक निवडणूक मंगळवारी पार पडली. यात ८७.८१ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १४ प्रभागासाठी २८ उमेदवार रिंगणात होते. येथे ३ हजार ४१२ मतदार होते. यापैकी १५५१ पुरुष, १४४५ महिला असे एकूण २,९९६ मतदारांनी मतदान केले. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चौकात मोठा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. होता. निवडणूक प्रक्रियेवर उपविभागीय अधिकारी खलाटे, तहसीलदार वाकलेकर, मुख्याधिकारी शेळकी आदी अधिकारी लक्ष ठेवून होते.