रात्रभर भटकत राहिले भावी पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 11:32 PM2018-03-08T23:32:59+5:302018-03-08T23:33:22+5:30

चंद्रपुरात गुरुवारपासून पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी राज्यभरात असंख्य युवक बुधवारीच चंद्रपुरात दाखल झाले. मात्र त्यांच्या निवासाची व जेवणाची कुठेही सोय नसल्याने या युवकांना बुधवारची रात्र भटकून वा मिळेल तो आसरा शोधन काढावी लागली.

Future police wandered overnight | रात्रभर भटकत राहिले भावी पोलीस

रात्रभर भटकत राहिले भावी पोलीस

Next
ठळक मुद्देना जेवण, ना निवारा : भरती प्रक्रियेसाठी विविध जिल्ह्यातील युवक चंद्रपुरात दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपुरात गुरुवारपासून पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी राज्यभरात असंख्य युवक बुधवारीच चंद्रपुरात दाखल झाले. मात्र त्यांच्या निवासाची व जेवणाची कुठेही सोय नसल्याने या युवकांना बुधवारची रात्र भटकून वा मिळेल तो आसरा शोधन काढावी लागली. विशेष म्हणजे, पोलीस विभागाने पोलिसांच्या जीमखाना परिसरात या युवकांची राहण्याची सोय केली होती. मात्र तशी सूचना युवकांना मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.
चंद्रपुरात ९० जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी राज्यभरातून ११ हजार ९१ बेरोजगार युवक आपले नशिब आजमावत आहेत. यात दोन हजार ४९८ युवती तर आठ हजार ५९३ युवकांचा समावेश आहे. गुरुवारी पहाटे ५ वाजतापासून या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याने राज्यभरातील उमेदवार बुधवारी सायंकाळीच चंद्रपुरात दाखल झाले. यातील बहुतांश जणांनी आपल्यासोबत जेवनाचा डब्बा व इतर खाद्य पदार्थ आणले होते. यातील काही जणांनी पोलीस मुख्यालयासमोर असलेल्या वि.दा. सावरकर स्मारकाजवळ आपले डब्बे खावून रात्र घालविली. मात्र अनेकांना तिथे जागा नसल्याने जागेचा शोध घेत रात्री शहरात भटकंती करावी लागली.
पोलीस मुख्यालयासमोरच बसस्थानक असल्याने अनेक युवकांनी बसस्थानकात रात्र काढली. तर काही जणांनी रेल्वे स्थानकाचा आसरा घेतला. त्यानंतर पहाटेच्या सुमारासही या युवकांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. कशाचीच सोय नसल्याने व सार्वजनिक शौचालये माहित नसल्याने पहाटेही या युवकांना शहरात भटकावे लागले. एवढे सर्व करून हे हजारो युवक पोलीस मुख्यालयात भरती प्रक्रियेसाठी पहाटे ५ वाजता उपस्थित झाले. मात्र तिथेही त्यांना गैरसोयीचाच सामना करावा लागला.
यवतमाळमधून आलेल्या एका युवकाने सांगितले की त्याला व त्याच्या सहकाºयांना आकाशाखाली मोकळ्या जागेवर रात्र काढावी लागली. डास व थंडीमुळे रात्रभर झोप लागली नाही. अनेक आवश्यक सुविधांसाठी पैसे खर्च करावे लागले.
५९० उमेदवार पात्र
गुरुवारी पहाटेपासून ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या पहिल्या दिवशी ८०० उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली. त्यातील ५९० उमेदवार या चाचणीत पात्र ठरले आहे, अशी माहिती पोलीस विभागाने दिली. या चाचणीवर ज्या उमेदवारांना आक्षेप घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी १० मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. १० मार्चच्या आधी उमेदवारांना या चाचणी प्रक्रियेवर आक्षेप घेता येणार आहे.

Web Title: Future police wandered overnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.