आठवीतील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात
By admin | Published: July 12, 2014 11:34 PM2014-07-12T23:34:13+5:302014-07-12T23:34:13+5:30
शासनाच्या धोरणानुसार वर्ग ५ ते ८ पर्यंतच्या वर्गांना उच्च प्राथमिक शिक्षणाचा दर्जा देऊन प्रत्येक जि.प. शाळेत आठवा वर्ग सुरू करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. सत्र सुरू होऊन १५ दिवसांपेक्षा जास्त
पालकांची चिंता वाढली : जिल्हा परिषदेकडे शिक्षकांची कमतरता
उदय गडकरी - सावली
शासनाच्या धोरणानुसार वर्ग ५ ते ८ पर्यंतच्या वर्गांना उच्च प्राथमिक शिक्षणाचा दर्जा देऊन प्रत्येक जि.प. शाळेत आठवा वर्ग सुरू करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. सत्र सुरू होऊन १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी संपला तरी अभ्यासक्रमानुसार जिल्हा परिषद शाळेकडे शिक्षकच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाणार असल्याची भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे. परिणामी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्हा परिषदेने जिल्हाभरात सुमारे १५० जि.प. शाळांमध्ये आठव्या वर्गाचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. मात्र त्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाजवळ ५५ शिक्षकच कार्यरत आहेत. आठव्या वर्गासाठी विज्ञान, गणीत आणि इंग्रजी या विषयाचे स्वतंत्र शिक्षक अत्यावश्यक आहेत. प्रत्येक शाळेसाठी तीन शिक्षक म्हटले तरी ४५० शिक्षकांची अत्यंत आवश्यकता आहे. परंतु जिल्हा परिषदेकडे बी.एस.सी. गुणवत्ता प्राप्त केलेले केवळ ५५ शिक्षकच आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून गुणवत्ताधारक विद्यार्थी घडविण्याचे शासनाचे स्वप्न अधुरेच राहणार आहे.
सावली तालुक्यातील नऊ जि.प. शाळांमध्ये आठवा वर्ग सुरू झाला आहे. आणि तालुक्यात विज्ञान विषयातील पदवीधर केवळ तीनच शिक्षक कार्यरत आहेत. जिल्ह्यात यापेक्षा वेगळी स्थिती नाही. सावली तालुक्यात जिल्हा परिषदेचे दोन विद्यालये आहेत. त्यामध्येसुध्दा विज्ञान शिक्षकांचा अभाव आहे. एवढेच नव्हे तर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनाच बसण्यासाठी पुरेशा वर्गखोल्या नाही. त्यात भर उच्च प्राथमिक शाळेची. आठव्या वर्गाची विद्यार्थी कुठे बसणार, त्यांच्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळेची व्यवस्था कशी करणार, असे अनेक समस्यांचे डोंगर आहेत. जि.प. शिक्षण विभागाच्या धोरणानुसार एका वर्गात ६९ विद्यार्थी असतील तर दोन पदवीधर शिक्षक आणि ७० विद्यार्थी असतील तर ३ पदवीधर शिक्षकांची नियुक्ती करता येते. परंतु अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच असते.