घोडाझरीत तेंदूपत्ता संकलनावर गदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 09:40 PM2019-03-25T21:40:16+5:302019-03-25T21:40:32+5:30
फाटक्या संसाराची विस्कटलेली आर्थिक घडी सुधारणारा तेंदूपत्ता हंगाम लवकरच सुरू होणार आहे. मात्र, घोडाझरी अभयारण्याच्या प्रभावक्षेत्रात तेंदूपत्ता संकलनाला मंजूरी मिळाली नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना यावर्षी रोजगारापासून वंचित राहावे लागणार आहे.
घनश्याम नवघडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : फाटक्या संसाराची विस्कटलेली आर्थिक घडी सुधारणारा तेंदूपत्ता हंगाम लवकरच सुरू होणार आहे. मात्र, घोडाझरी अभयारण्याच्या प्रभावक्षेत्रात तेंदूपत्ता संकलनाला मंजूरी मिळाली नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना यावर्षी रोजगारापासून वंचित राहावे लागणार आहे.
नागभीड तालुका जंगल व्याप्त आहे. तालुक्यातील शेकडो गावे जंगलावर अवलंबून आहेत. शेतीसोबतच या परिसरातील नागरिक मोहफुले वेचणे, मध, डिंक व रानमेवा गोळा करतात. यातील तेंदूपत्ता संकलनाचे काम सर्वाधिक लाभकारक आहे. नागभीड वनपरिक्षेत्रातील नवखळा, कुनघाडा चक, कोरंबी, पेंढरी, चिचोली, कसर्ला, डोंगरगाव, चिंधी चक, किटाळी बोरमाळा, हुमा, घोडाझरी व चिंधी माल आदी गावे अभयारण्याच्या प्रभाव क्षेत्रातील येतात.
मागील वर्षी जानेवारी महिन्यात तालुक्यातील घोडाझरी पर्यटन स्थळाला अभयारण्य म्हणून शासनाने परवानगी दिली. परिणामी ही गावे घोडाझरी अभयारण्याच्या प्रभाव क्षेत्रात समाविष्ट करण्यात आली आहेत. या गावातील नागरिक शेतीसोबतच तेंदूपत्ता संकलन करण्याकडे ‘जोड व्यवसाय' म्हणून पाहतात.
या काळात भात शेतीची कोणतीही कामे शिल्लक राहत नाही. साधारणत; एक महिना तेंदूपत्त्याचा हा हंगाम सुरू राहतो. या हंगामात घरातील सर्वच सदस्य तेंदूपत्ता संकलनात भाग घेतात. कुटुंबाची आर्थिक स्थिती रूळावर आणण्यासाठी तेेंदुपत्ता हंगाम मोठा आधार वाटतो. मात्र, घोडाझरी अभयारण्याच्या प्रभाव क्षेत्रातील अनेक गावांमध्ये तेंदुपत्ता संकलनाला मनाई करण्यात आली. त्यामुळे रोजगारासाठी कुठे जावे, हा फार मोठा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे. दरम्यान, नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रात घोडाझरी अभयारण्य प्रभावित गावे आहेत. ती गावे नेमकी किती आहेत, याची माहिती मिळाली नाही. ही गावे पुन्हा वाढू शकतात, असेही ग्रामस्थांनी सांगितले.
केवळ १९ पानफळ्या राहणार सुरू
वनपरिक्षेत्रात केवळ तेंदूपत्ता संकलनाच्या १९ पानफळ्या सुरू राहणार आहेत. याअगोदर ४३ पानफळ्या सुरू होत्या. पण, यातील ११ फळ्या नाममात्र असल्याची माहिती पुढे आली. प्रत्यक्षात ३२ फळ्यांवरच तेंदूपत्ता संकलन केल्या जात होते. यातील १३ फळ्यांवर गदा आली. यावर्षी २२ एप्रिलपासून तेंदूपत्ता सुरू होण्याची शक्यता आहे. हा हंगाम सुमारे एक महिना चालतो.