गडचांदूर नगरपरिषदेच्या कचरा डेपोमुळे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 12:35 AM2018-03-06T00:35:31+5:302018-03-06T00:35:31+5:30
कोरपना तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या गडचांदूर शहरातून जमा केलेला घनकचरा काही वर्षांपासून गडचांदूर-भोयगाव रस्त्यालगत रेल्वे फाटकाजवळ टाकण्यात येत आहे
आॅनलाईन लोकमत
गडचांदूर : कोरपना तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या गडचांदूर शहरातून जमा केलेला घनकचरा काही वर्षांपासून गडचांदूर-भोयगाव रस्त्यालगत रेल्वे फाटकाजवळ टाकण्यात येत आहे. या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा कचरा डेपो बंद करावा, अशी मागणी युवक काँग्रेसचे कोरपना तालुका उपाध्यक्ष मुन्ना मासीरकर यांनी केली आहे. मार्च अखेरपर्यंत कचरा डेपो न हलविल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
गडचांदूर शहरातून संकलित करण्यात आलेला घनकचरा काही वर्षांपासून घंटागाड्याच्या माध्यमातून रस्त्याच्या कडेला टाकला जात आहे. कचºयाचे वर्गीकरण करण्यात न आल्याने ओला कचरा सडत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत आहे. तोच कचरा पेटविल्यामुळे मुख्य रस्त्यावर धुराचे लोळ येतात. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणाºया वाहन चालकांना नाक-तोंड दाबूनच पुढे जावे लागत आहे. त्याच वेळेस अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या ठिकाणाजवळ चारही बाजुने नागरी वस्ती वाढल्याने कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्यांनाही त्रास होत आहे. परिणामी दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचºयामुळे डासांच्या प्रादुर्भाव वाढला असून यामुळे डेंग्यू, मलेरिया स्वाईन फ्लू या सारख्या साथीच्या आजाराची भीती आहे. याच आवारात मोकाट कुत्रे, डुकरे, मोकाट जनावरे कचºयामध्ये अन्न शोधण्याचा प्रयत्न करीत असल्याने कचरा अधिकच पसरत आहे.
केंद्र आणि राज्य शासन देशभरात स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवीत असताना गडचांदूर जवळील महामार्ग याला अपवाद ठरत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन रस्त्यावरील कचरा डेपो योग्यस्थळी हलविण्यात यावे, घाणीचा नागरिकांना त्रास होणार नाही याची दखल घ्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
काही वर्षांपासून गडचांदूर नगर परिषदेने गडचांदूर-भोयगाव रस्त्यालगत रेल्वे फाटकाजवळ कचरा डेपो बनविला आहे. या रस्त्याने मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना ओल्या कचऱ्यांने व धुळाच्या लोळाने आरोग्य धोक्यात आले आहे. नगर परिषेदेने रस्त्यावरील कचरा डेपो तत्काळ योग्यस्थळी हलवावे अन्यथा आंदोलन करावे लागेल.
- मुन्ना मासीरकर,
उपाध्यक्ष,
कोरपना तालुका युवक काँग्रेस.