आदिवासी कोलाम बांधवांचा गडचांदूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 06:00 AM2019-09-24T06:00:00+5:302019-09-24T06:00:42+5:30
कंपनी आदिवासी बांधवांचे शोषण करीत असल्याचा आरोप करीत माणिकगड व्यवस्थापनावर अॅट्रासिटी दाखल करा, या मागणीसाठी आदिवासी कोलाम बांधवांनी गडचांदूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला. याशिवाय गावकऱ्यांचे पिण्याच्या पाण्याचे स्रोत नष्ट करणे, आदिवासीची शेती नष्ट करणे किंवा बळकावणे अशा अनेक तक्रारी आदिवासींच्या कंपनीविरोधात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
बाखर्डी : गडचांदूरस्थित माणिकगड सिमेंट कंपनीच्या तक्रारीवरून ४० ते ५० आदिवासी कोलाम समाजावर विविध कलमा अतंर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याने आदिवासी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा प्रकार कंपनी जाणीवपूर्वक करीत आहे. चार ते पाच गावांना जाणारा रस्ता बंद करुन सरकारी रस्त्यावर कंपनी गेट तपासणी नाका बसवून अनेकवेळा गेटवर लोकाना थांबविले जात आहे. तिथून बैलबंडी, ट्रॅक्टर, मोटार सायकल जाण्यास मज्जाव केला जात आहे. कंपनी आदिवासी बांधवांचे शोषण करीत असल्याचा आरोप करीत माणिकगड व्यवस्थापनावर अॅट्रासिटी दाखल करा, या मागणीसाठी आदिवासी कोलाम बांधवांनी गडचांदूर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला. याशिवाय गावकऱ्यांचे पिण्याच्या पाण्याचे स्रोत नष्ट करणे, आदिवासीची शेती नष्ट करणे किंवा बळकावणे अशा अनेक तक्रारी आदिवासींच्या कंपनीविरोधात आहेत. आदिवासी बांधवांचे शोषण सुरू असताना साधी चौकशी न करता कोलाम आदिवासी बांधवांवर गुन्हे दाखल करून पोलीसही कंपनीची पाठराखण करीत असल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केला आहे. यावेळी आबीद अली, भाऊराव कन्नाके, मारोती येडमे, अरूण उद्दे, केशव कुडमेथे, मुता सिडाम, झाडु सिडाम, ताराबाई कुडमेथे, पुष्पा मंगाम, शंकर आत्राम आदी उपस्थित होते.