गणपती बाप्पा मोरय्या....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 11:42 PM2017-09-05T23:42:22+5:302017-09-05T23:43:40+5:30
अल्पावधीतच तरुणांमध्ये लोकप्रिय झालेला; मात्र प्रचंड ध्वनी प्रदूषण करणारा डिजे यंदाच्या मिरवणुकीतून हद्दपार करण्यात आला आणि मिरवणुकीतील श्वासच गेला, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अल्पावधीतच तरुणांमध्ये लोकप्रिय झालेला; मात्र प्रचंड ध्वनी प्रदूषण करणारा डिजे यंदाच्या मिरवणुकीतून हद्दपार करण्यात आला आणि मिरवणुकीतील श्वासच गेला, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या. मात्र या प्रतिक्रिया गणेशभक्तांनी खोट्या ठरविल्या. पारंपारिक वाद्य, ढोल-ताशांच्या गजरात तरुणांची पावलं बेभानपणे थिरकली. वाजंत्री आणि तरुणार्इंच्या उत्सहाने डिजेशिवायही आनंदोत्सव साजरा होतो, हे दाखवून दिले. ढोल-ताशांचा गजर आणि गणपती बाप्पा मोरय्या...च्या गगनभेदी घोषणांनी चंद्रपूर निनादून गेले.
२५ आॅगस्टला गणरायाची स्थापना झाली. १२ दिवस गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज मंगळवारी लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आणि गणेशभक्तांची मने हेलावली. बाप्पाला पुढल्या वर्षी लवकर येण्याचे वचन मागत गणेशभक्तांनी बाप्पाला निरोप दिला.
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मिरवणुका उशिरा निघाल्या. दुपारी २ वाजेपर्यंत विसर्जनाच्या मुख्य मार्गावर फारशी रेलचेल नव्हती. डिजे नसल्यामुळे गणेशभक्तांचा उत्साह कमी झाला असावा, असा अंदाज बांधला जात होता. मात्र हा अंदाज गणेशभक्तांनी खोटा ठरविला. सायंकाळी ४ वाजतानंतर मिरवणुका मुख्य रस्त्यावर आल्या. सायंकाळी भाविकांची अलोट गर्दी उसळली आणि बाप्पा मोरय्याचा गजर यामुळे अख्खे चंद्रपूर शहर निनादून गेले. यावेळी शहरातील प्रमुख मार्गावर गणेशभक्तांची गर्दी आणि विविध गणेशमंडळांनी केलेली आकर्षक सजावट व देखावे मिरवणुकीत लक्ष वेधून घेत होते.
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी चंद्रपूर शहरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. जुना वरोरा नाका येथून कस्तुरबा गांधी मार्गाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली. यंदा सायंकाळी ५ वाजतानंतर कस्तुरबा गांधी मार्गावर जटपुरा गेटपासून आझाद बगीचापर्यंत मिरवणुकांची रिघ लागली होती. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्यात आला.
सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मिरवणुका गांधी चौकात पोहोचल्या. यावेळी बाबुपेठ, गिरणार चौक परिसरातील गणेश मंडळेही मिरवणुकीत सहभागी झाले आणि ढोलताशे, भजनमंडळ, लेझीमची धूम सुरू झाली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत रामनगर, नगिना बाग मार्ग, भानापेठ, पठाणपुरा मार्ग, अंचलेश्वर गेटच्या आतील मार्गावर विसर्जन मिरवणुका सुरूच होत्या.
सायंकाळी ७ वाजता तर रस्त्यांवर बघ्यांची गर्दी उसळली होती. शहरातील मुख्य मार्ग जटपुरा गेट, कस्तुरबा मार्ग, महात्मा गांधी मार्ग या मार्गांवर सार्वजनिक गणेश मंडळांची रिघ लागली. विठ्ठल मंदिर वॉर्ड, पठाणपुरा, समाधी वॉर्ड परिसरातील गणेश मंडळे गांधी चौकात पोहोचली. यावेळी लोकमान्य टिळक शाळा ते जटपुरा गेट या मार्गावर असलेल्या गणेश मंडळांचे मंदगतीने मार्गक्रमण सुरू होते. यावेळी मुख्य चौकात मचाणी उभारून पोलीस प्रशासन परिस्थतीवर नियंत्रण ठेवत होते. ड्रोन कॅमेºयाद्वारेही परिस्थितीवर पोलिसांचे नियंत्रण होते. पोलीस अधीक्षक नियती ठाकर या स्वत: परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. वाहतूक पोलिसांनीही जबाबदार उत्तम सांभाळल्यामुळे कुठेही वाहतूक ठप्प होताना दिसली नाही. मिरवणुकीदरम्यान आलेल्या रुग्णवाहिकांना मार्ग मोकळा करून दिला जात होता.
गणेश मंडळांचे स्वागत
लोकमान्य टिळक शाळेजवळ राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे स्वत: गणेश मंडळांचे स्वागत करीत होते. पदाधिकाºयांना लोकमान्य टिळकांची प्रतिमा भेट देऊन सत्कारही करीत होते. यावेळी आ. नाना श्यामकुळे, महापौर अंजली घोटेकर उपस्थित होते. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर हे काही पदाधिकाºयांसोबत मिरवणुकीत पायदळ फिरून गणेशभक्तांचा उत्साह वाढवित होते. शंकराश्रम लॉजजवळ चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमेटीतर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी आ. विजय वडेट्टीवार, नंदू नागरकर, प्रकाश देवतळे हे स्वत: पदाधिकाºयांचा सत्कार करीत होते. गांधी चौकात जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने गणेश मंडळाचे स्वागत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया, राहुल पुगलिया, गजानन गावंडे तर त्यानंतर शिवसेना पक्षातर्फे किशोर जोरगेवार व अन्य पदाधिकारी गणेश मंडळांच्या पदाधिकाºयांचे स्वागत करीत होते. छोटा बाजार चौक परिसरात प्रहार संघटनेतर्फे गणेश मंडळाच्या पदाधिकाºयांचे स्वागत केले जात होते.
विसर्जनस्थळी चोख बंदोबस्त
दाताळा मार्गावरील इरई नदी व रामाळा तलाव हे विसर्जनस्थळ असल्यामुळे या ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आपातकालीन यंत्रणाही सज्ज होती. गणेश विसर्जनासाठी परिपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती. तर मनपा प्रशासनाने उभारलेल्या विसर्जन कुंड व निर्माल्य कलश यामध्येही अनेकांनी बाप्पाचे विसर्जन केले. रात्री उशिरापर्यंत दोन्ही मार्गावर मिरवणुका सुरू होत्या.
म्हशींचा कळप मिरवणुकीत
रात्री ८ वाजताच्या सुमारास मिरवणुकीत चिक्कार गर्दी होती. दरम्यान, लोकमान्य टिळक शाळेच्या बाजुने अचानक म्हशींचा कळप मिरवणुकीत शिरला. सुसाट धावत असलेल्या म्हशींमुळे मिरवणुकीतील नागरिकांमध्ये तारांबळ उडाली. सुदैवाने सदर रस्ता रुंद असल्याने चेंगराचेंगरीसारखा प्रकार घडला नाही. विशेष म्हणजे, रस्त्यावर प्रत्येक ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त असतानाही म्हशीचा कळप मिरवणुकीत शिरलाच कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.