उमेदवारासह कार्यकर्ते घालणार १० रुपयांची गांधी टोपी
By admin | Published: February 3, 2017 01:04 AM2017-02-03T01:04:24+5:302017-02-03T01:04:24+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उभा राहू इच्छिणाऱ्या उमेदवारांना कार्यकर्त्यावर मोठ्या प्रमाणात
कार्यकर्त्याचा चहा ६ रू. तर जेवण ७५ रुपये : प्रशासनातर्फे तब्बल १०५ वस्तूंचे दर निश्चित
राजकुमार चुनारकर चिमूर
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत उभा राहू इच्छिणाऱ्या उमेदवारांना कार्यकर्त्यावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो आहे. त्यानुसार प्रशासनाने खर्चाचे दर निश्चित केले असून चहासाठी ६ रुपये, पुरी-भाजी, भजे, चिवडा (स्नॅक)च्या प्लेटसाठी २० रुपये तर कार्यकर्त्याच्या जेवणावळीमध्ये शाकाहारी जेवणासाठी ७५ रुपये आणि मासांहारी जेवनासाठी २०० रुपयांचा दर निश्चित करण्यात आला आहे. प्रशासनातर्फे तब्बल १०५ वस्तूंच्या दराची सूची तयार करण्यात आली असून ती सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना पाठविण्यात आली आहे.
उमेदवाराकडून प्रचार काळात कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात येतो. त्यामध्ये उमेदवारांचा चहा, पान तसेच भोजन व्यवस्थेसाठी सुमारे पाच प्रकारच्या वस्तू आयोगाने निश्चित केल्या आहेत. त्यात पुरीभाजी, चिवडा, भजे, पोहे (स्नॅक) २० रुपयांना असून चहा ६, तर कॉफीचा दर १० रुपये असणार आहे. शाकाहारी जेवन ७५ रुपये व मासाहारी जेवन २०० रुपयांप्रमाणे दर निश्चित करण्यात आला आहे.
प्रशासनाकडून खुल्या बाजारातून मागविण्यात आलेल्या दरानुसार निवडणुकीत लागणाऱ्या वस्तूंचे दर ठरविण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने फर्निचर आणि मंडप व्यवस्थेच्या ३७ वस्तू चहा-पान भोजनाच्या ५ वस्तू होर्डीग, बॅनर, झेंडा, टोपीचे १२ प्रकार शासनमान्य जाहिरातीचे दर, टी.व्ही. चॅनलवरील जाहिरातीचे दर तसेच झेरॉक्सच्या दरांचा समावेश आहे.
तसेच साधी प्लास्टिक खुर्चीचे दर वगळता इतर जवळपास सर्वच दर १०० रुपयाच्या पुढे ठरविण्यात आले आहेत. प्रचारात वापरण्यात येणाऱ्या वाहनांमध्ये चारचाकी, तीनचाकी, आणि रिक्षा यांचेही दर ठरविण्यात आले आहेत. गांधी टोपीचा दर १० रुपये आहे. त्यामुळे उमेदवारासह कार्यकर्ते आता १० रुपयाची गांधी टोपी वापरणार आहेत.
उमेदवारासाठीचे काही प्रमुख खर्चाचे दर
चहा ६ रुपये, कॉफी १० रुपये, नास्ता, भजे-चिवडा,स्नॅक २० रुपये, शाकाहारी जेवन ७५ रुपये, मासाहारी जेवन २०० रू.(प्रति), बिसलरी बाटल २० रुपये, पाणी कॅन ४० रुपये, गांधी टोपी १० रुपये, दुपट्टा ५० रुपये, कमांडर, जीप, सुमो १ हजार रुपये, प्रति दिवस टाटा मॅजिक ८०० रुपये, तीन चाकी आॅटोरिक्षा ५०० रुपये, प्लास्टिक खुर्ची ५ रुपये, लाऊड स्पीकर १२०० रुपये प्रतिदिन, व्हिडिओग्राफी प्रतिदिन २ हजार रुपये.