बाप्पाच्या स्वागतासाठी गणेशभक्त सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 11:02 PM2017-08-23T23:02:39+5:302017-08-23T23:03:01+5:30
आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी गणेशभक्तांनी जवळजवळ पूर्ण केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची तयारी गणेशभक्तांनी जवळजवळ पूर्ण केली आहे. बाप्पा आपल्या घरी राहायला येणार, म्हणून नागरिक उत्साहित झाले आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनीही मंडप उभारणी, डेकोरेशन, विद्युत पुरवठा याची तयारी पूर्ण केली आहे. शुक्रवारी मोठ्या उत्साहात श्रींचे स्वागत करण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत.
गणेशोत्सव दिवाळीनंतरचा वर्षभरातील मोठा उत्सव समजला जातो. या उत्सवामुळे दहा दिवस शहरात, गावागावात भक्तीचे वातावरण राहते. यंदा हा उत्सव साजरा करण्यासाठी जिल्हाभरात जय्यत तयारी सुरू झाली आहे. मूर्तीकार महिनाभरापासूनच मूर्ती तयार करण्याच्या कामाला लागले आहेत. तेदेखील आता मूर्तीवर शेवटचा हात फेरताना दिसून येत आहे. शुक्रवारी बाजारपेठेत गर्दी उसळत असल्याने अनेकजण दोन दिवसांपूर्वीच गणेशमूर्ती घेऊन ठेवतात. त्यामुळे शहरातील हिंदी सीटी शाळेजवळ आणि छोटा बाजार चौकात गणेशमूर्र्तींची दुकाने लागली आहे. हिंदी सिटी शाळा ते रघुवंशी कॉम्प्लेक्सदरम्यानच्या मार्गावर महानगरपालिकेकडून गणेशमूर्र्तींच्या दुकानांसाठी मंडप उभारून दिले जाते.हे कामदेखील आज बुधवारी अंतिम टप्प्यात आलेले दिसले. काही सार्वजनिक गणेश मंडळे आजच आपल्या गणेशमूर्ती मंडपात नेऊन ठेवताना दिसून आले.
दरम्यान, रामाळा तलाव आणि दाताळा मार्गावरील इरई नदीपात्रात नागरिकांकडून गणेशाचे विसर्जन केले जाते. अनेकजण एक दिवसानंतर गणेश विसर्जन करतात. त्यामुळे हे विसर्जनस्थळही प्रशासनाने स्वच्छ केले आहे. मनपाकडून निर्माल्यकुंडाची व्यवस्था आहे.
वर्गणीतून दहा टक्के रक्कम अनाथाश्रमाला देण्याचे आदेश
सावंजनिक गणेश मंडळांनी नागरिकांकडून गोळा केलेल्या वर्गणीची उधळपट्टी होऊ नये म्हणून या वर्गणीच्या रकमेवर धर्मादाय आयुक्तांची नजर असणार आहे. विशेष म्हणजे, गणेश मंडळांनी गोळा केलेल्या वर्गणीच्या रकमेतील १० टक्के रक्कम अनाथाश्रमाला द्यावी, असे आदेश राज्याचे धर्मादाय आयुक्त एस.जी. डिगे यांनी दिले आहे. तशी नोटीस सार्वजनिक गणेश मंडळांना जारी करण्यात आली असून या संबंधीचा अहवाल स्थानिक धर्मदाय आयुक्त कार्यालयात देण्याच्या सूचनाही गणेश मंडळांना देण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक गणेश मंडळांना गणेशोत्सवासाठी येथील सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालयात अर्ज सादर करून नोंदणी करणे बंधनकारक आहे. मंडळांनी सर्व अटींची पूर्तता केल्यानंतरच धर्मदाय आयुक्तांकडून गणेशोत्सवासाठी परवानगी दिली जाते. सार्वजनिक गणेशोत्सवाकडे सामाजिक उपक्रम म्हणून बघितले जाते. समाजात एकोपा वाढवा, हा सार्वजनिक गणेशोत्सवामागील मूळ उद्देश आहे. या धार्मिक कार्यातून सार्वजनिक गणेश मंडळांकडून सामाजिक कार्यही व्हावे या उदात्त हेतूने धर्मदाय आयुक्तांनी यावर्षीपासून हा नवीन उपक्रम सुरू केला आहे. यात सार्वजनिक गणेश मंडळांनी गोळा केलेल्या वर्गणीच्या रकमेतील दहा टक्के रक्कम अनाथाश्रमाला द्यायची आहे. ही रक्कम दिल्यानंतर त्याचा अहवाल धर्मदाय आयुक्त कार्यालयात देणे बंधनकारक आहे. या संबंधीच्या नोटीस धर्मदाय आयुक्तांकडून गणेश मंडळांना देण्यात आल्या आहेत. या उपक्रमाला गणेश मंडळांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.