गणेश रहिकवारची चित्रपट क्षेत्रात भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:13 AM2019-05-19T00:13:38+5:302019-05-19T00:14:05+5:30
विविध विषयांवर एकामागून एक लघु कथाचित्रपट तयार करून त्या क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे बल्लारपूर येथील गणेश रहिकवार यांची बल्लारपूरचे सुभाष घई अशी ओळख आहे. त्याला अर्थही तसाच आहे. गणेश रहिकवार यांची अंगकाठी, चेहरा मोहरा सुभाष घई यांच्या प्रमाणेच असून चित्रपटाबाबत त्यांची तन्मयता ही त्यांचे सारखीच आहे.
वसंत खेडेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : विविध विषयांवर एकामागून एक लघु कथाचित्रपट तयार करून त्या क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे बल्लारपूर येथील गणेश रहिकवार यांची बल्लारपूरचे सुभाष घई अशी ओळख आहे. त्याला अर्थही तसाच आहे. गणेश रहिकवार यांची अंगकाठी, चेहरा मोहरा सुभाष घई यांच्या प्रमाणेच असून चित्रपटाबाबत त्यांची तन्मयता ही त्यांचे सारखीच आहे. बॉलिवूडच्या डुप्लीकेट कलाकारांना देऊन बनविलेल्या आमीर सलमान शाहरूख या चित्रपटात रहिकवार यांनी सुभाष घई यांची भूमिका साकारली आहे.
विशेष म्हणजे, गणेशचा लहान भाऊ दुर्गा हा अभिनेता शाहरूख खानसारखा दिसतो. तो मुंबईतील आॅर्केस्ट्रामध्ये तसेच चित्रपट व स्टेज कार्यक्रमात ज्युनि. शाहरूख खान म्हणून वावर आहेत. तर गणेश लघुचित्रपट क्षेत्रात गाजत आहे.
अभिनय, लेखन आणि चित्रपटकलेविषयी आवड गणेश यांना शालेय जीवनापासूनच होती. व्यावसायिक कॅमेरा हातात आल्यानंतर संकलनाची कलाही त्यांनी अवगत केली. लघुचित्रपट कसे बनवायचे याचे ज्ञान त्यांनी घेतले. पहिला लघुपट मित्र हा केवळ पाच मिनिटांचा बनविला. फेसबुक, व्हाट्सअॅपवर तो टाकला. लोकांना तो आवडला. त्यानंतर दोन माहितीपट बनविले. प्रतिसाद मिळत गेल्याने हुरूप वाढला आणि एकामागून एक विविध विषयांवर १० ते ७५ मिनीटपर्यंत चालणारे लांबीचे लघुचित्रपट काढले. हादसा, तुझा संसार आई, काश, जाल, नान्या, दफन, अवनी, ताई की पालकी, ए लव स्टोरी, कोई है?, बहुरूपीया इत्यादी १५ लघुचित्रपट त्यांनी आजवर बनविले आहेत.
यातील अवनी हा चिपत्रट बेटी बचाओ या विषयावर ७५ मिनिटांचा चित्रपट आहे. या लघु चित्रपटाला राष्टÑीय पुरस्कारही मिळाले आहेत. इतर ही अनेक पुरस्कार त्याने मिळविले आहेत. संकलनाची उत्तम जाण त्यांना आहे. सोबतच छायांकनाची, त्यामुळे त्यांची चित्रपट तंत्रशुद्ध आणि देखणी असतात. त्यांच्यातील हे गुण बघूनच नांदेड येथील एका निर्मात्याने ‘स्मशान’ तसेच ‘दानत’ या दोन चित्रपटांची जबाबदारी सोपविली. ती त्यांनी नुकतीच पूर्ण केली आहे. ‘पश्चाताप’ आणि ‘एक कदम स्वच्छता की ओर’ या दोन लघुचित्रपटांवर सध्या त्यांचे काम सुरू आहे. त्यानंतर अडीच तासाच्या पिक्चर फिल्मकडे ते वळणार आहेत. त्यांचीही नावे ठरली आहेत.
गणेशच्या कलेपासून इतरांना प्रेरणा
गणेश यांनी या क्षेत्रात स्वत:ला झोकून दिले आहे. आपल्या चित्रपटात ते बल्लारपूर, चंद्रपूर तसेच नजिकच्या गावातील कलावंताना वाव देत आहेत. त्यांची झेप मोठी आहेच, सोबतच या भाागातील अभिनय प्रतिभा अधिक समृद्ध व्हावी, याकरिता ते प्रयत्नशील आहेत. बल्लारपूरसारख्या लहान शहरातील गणेश रहिकवार यांची लेखन, दिग्दर्शन, संकलन व छायांकन याबाबतची झेप कौतुकास्पद आहे. एक कलावंत म्हणून त्यांनी केलेले कार्य जिल्ह्यातील इतर तरुणांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.