दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर गुंडावार कुटुंबीयांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:22 AM2021-05-30T04:22:57+5:302021-05-30T04:22:57+5:30
पाॅझिटीव्ह स्टोरी सचिन सरपटवार भद्रावती : कोरोना संसर्ग वाढलेला होता. ऑक्सिजन पातळी खालावली होती. श्वास घेणे अवघड जात होते. ...
पाॅझिटीव्ह स्टोरी
सचिन सरपटवार
भद्रावती : कोरोना संसर्ग वाढलेला होता. ऑक्सिजन पातळी खालावली होती. श्वास घेणे अवघड जात होते. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात असल्याचे जाणवत होते. कुटुंबातील आजोबा-आजीपासून नातीपर्यंत आठही सदस्य कोरोना पॉझिटीव्ह होते. परिवाराची हतबलता समोर दिसत होती. पर्याय नव्हता.
रुग्णालयात भरती असताना आबा घरी कधी येणार, आम्ही सगळे तुमची वाट पाहत आहोत, तुम्ही लवकर या, अशी आर्जव भ्रमणध्वनीद्वारे स्वतः कोरोनाग्रस्त असलेली दहा वर्षांची नात ६७ वर्षांच्या आजोबांना करीत होती. मनात स्फुरण निर्माण झाले. इच्छाशक्ती निर्माण झाली. या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर चाळीस दिवसांनंतर चंद्रकांत गुंडावार यांनी कोरोनावर मात केली.
येथील चंद्रकांत गुंडावार यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाने कवेत घेतले होते. अगदी आजोबा चंद्रकांत गुंडावार ते अन्वी आशिष गुंडावार यांचा यात समावेश होता. चंद्रकांत गुंडावार यांना प्रथम चंद्रपूर व नंतर नागपूर येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. बेड न मिळाल्याने एक दिवस उशीर झाला. सिटीस्कॅन स्कोअर वाढत होता. तर ऑक्सिजन पातळी ८५ ते ९४ च्या दरम्यान होती. सात दिवस ते आयसीयूमध्ये होते. या दिवसात त्यांच्या आजूबाजूला असलेल्या पाच रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हा प्रसंग त्यांनी प्रत्यक्ष अनुभवला. मनावर निश्चितच परिणाम झाला. पण त्यांनी धीर सोडला नाही. कोरोनामुळे जरी पाच रुग्णांचा मृत्यू झाला असला तरी अन्य आठजण कोरोना मुक्त होऊन घरी गेले हा सकारात्मक विचार त्यांच्या मनात आला. घरच्यांच्या आतुरतेबाबत सांगताना गुंडावार भावुक झाले होते. घरातील सगळेजण कोरोनाग्रस्त होते व सगळेच सदस्य एकमेकांना धीर देत होते. सगळ्या कुटुंबाने कोरोनावर मात केल्यामुळे तुमचे आडनाव गुंडावार ऐवजी मृत्युंजय वार असे असायला पाहिजे होते, असा संदेश एका जणाने पाठविल्याचे त्यांनी सांगितले. याच इच्छाशक्तीच्या भरवशावर कोरोनावर मात केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कोरोनाला घाबरून न जाता आपण निश्चितच कोरोनावर मात करू शकतो. कोरोना नियमांचे पालन करा, असा संदेशही त्यांनी दिला.