देवाडा आश्रमशाळेत भोंगळ कारभार

By admin | Published: July 19, 2015 01:12 AM2015-07-19T01:12:15+5:302015-07-19T01:12:15+5:30

शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी लाखो रुपये खर्च करुन राजुरा तालुक्यातील देवाडा आश्रमशाळेत जनरेटर प्रकल्प उभारण्यात आला.

Garbage management at the Godda Ashramshala | देवाडा आश्रमशाळेत भोंगळ कारभार

देवाडा आश्रमशाळेत भोंगळ कारभार

Next

शंकर मडावी देवाडा(राजुरा)
शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी लाखो रुपये खर्च करुन राजुरा तालुक्यातील देवाडा आश्रमशाळेत जनरेटर प्रकल्प उभारण्यात आला. मात्र हा प्रकल्प सध्या कचऱ्याच्या ठिकाणी शोभेची वास्तू बनून आहे. प्रस्तूत प्रतिनिधीने सदर आश्रम शाळेला भेट दिली असता हा गंभीर प्रकार उजेडात आला. यासोबत या आश्रमशाळेत अनेक समस्या असून विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकूण या शासकीय आश्रमशाळेत भोंगळ कारभार सुरू आहे.
देवाडा परिसरातच नेहमी विजेचा लपंडाव सुरू असतो. यामुळे नागरिकही त्रस्त आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करुनही वीज वितरण कंपनी ही बाब गांभीर्याने घेत नसल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. परंतु आश्रमशाळेत अनेक वर्षांपासून वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी जनरेटरची सोय करण्यात आली आहे. वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार नेहमीच होत आहे. परंतु आश्रमशाळेतील वसतिगृहामध्ये जनरेटर लावल्या जात नसल्यामुळे आश्रमशाळेतील वसतिगृहांना वीज पुरवठा खंडित झाला की अंधारात रहावे लागते. या ठिकाणी पहिली ते १२ वीपर्यंत विद्यार्थी राहण्याची सोय आहे. जनरेटरची सुविधा सुरू करुन मिळत नसल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेक वर्षांपासून जनरेटरचा वापर केला जात नसल्याचे समजते. परंतु डिझेलचे खोटे बिल दाखविण्यात येत असल्याचीही माहिती आहे. आश्रमशाळेत वसतिगृहामध्ये सध्या मुली ९५ व मुले १०५ असे एकूण २०० विद्यार्थी आहेत. परंतु वसतिगृहामध्ये पंखे, खिडक्या, लाईट नाहीत. कवेलूचे घर असल्याने पावसाचे पाणी आतमध्ये साचून राहते. विद्यार्थ्यांकरिता वर्षामध्ये एक- दोन सहली घेण्यात येते. परंतु दूरदूरचे सहल न घेता देवाडा परिसरातील सिद्धेश्वर देवस्थान, अमलनाला डॅम्प जवळच सहल काढून खोटे बिल बनवून सादर करण्यात येत आहे. मागील वर्षाचे शिष्यवृत्ती काही विद्यार्थ्यांना दिली नाही. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सरकार लक्षावधी रुपयांचा खर्च करीत असले तरी जनरेटर यंत्रणा कार्यान्वित केली जात नसल्याने सगळा बट्टयाबोळ होत आहे आणि याची प्रचिती देवाडा येथील शासकीय पोस्टबेसिक आश्रमशाळेत येत आहे. नियोजन करुन जनरेटरचा उजेड न आल्याने लाखो रुपये खूर्चनही जनरेटर निरर्थक ठरला आहे.
देवाडा येथील आश्रमशाळा परिसरात अनेक वृक्ष होती. मुख्याध्यापक व अधीक्षक यांनी संगणमत करुन आदिवासी विभाग, वनविभाग व ग्रामपंचायत कार्यालय देवाडाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता वृक्षाची कत्तल केली. परस्पर विक्री करून आपले खिसे गरम केले. आश्रमशाळेतील गैररप्रकाराबाबत दैनिक वृत्तपत्रामध्ये अनेकदा बातमी प्रकाशित झाली. परंतु वरिष्ठ कार्यालय चंद्रपूरकडून अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारे चौकशी केली नाही. याकडे आश्रमशाळेतील भोंगळ कारभाराबाबत चौकशीकरिता महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व आदिवासी विभागाचे राज्यमंंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेता, आमदार, आयुक्त आदिवासी विभाग नाशिक, अप्पर आयुक्त आदिवासी विभाग नागपूर यांना आश्रमशाळेतील गैरव्यवहार प्रकरणाबाबात रजिस्ट्रीद्वारे पत्र पाठविले आहे.
१२ लाखांचे सौर ऊर्जा संयंत्र कचऱ्यात
देवाडा येथील आश्रमशाळेत मुलामुलींना राहण्याची व्यवस्था आहे. त्यांना आंघोळीसाठी गरम पाण्याची गरज असते. यासह विजेसंदर्भातील विविध गरजाही या प्रकल्पातून मागू शकतात. ही बाब लक्षात घेऊनच शासनाने या आश्रमशाळेत सौर ऊर्जा प्रकल्प उभारला. हा प्रकल्प दोन भागात उभा आहे. मात्र या प्रकल्पाची अतिशय दुरवस्था झाली असून तो सध्या बंद अवस्थेत आहे. मुळातच वसतिगृह अधीक्षक व मुख्याध्यापकाच्या अज्ञानामुळे हा प्रकल्प चुकीच्या ठिकाणी उभारण्यात आला.
कर्मचारी मद्याच्या आहारी
येथील जबाबदार कर्मचारी मद्याच्या आहारी गेले असून दारुच्या नशेत हे कर्मचारी विद्यार्थ्यांशी असभ्य वर्तन करीत असल्याच्या तक्रारी यापूर्वी विद्यार्थ्यानी केल्यानंतर पंचायत समिती सदस्य व सरपंचांनी वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र त्या तक्रारीची साधी चौकशीही करण्याचे धाडस अधिकाऱ्यांनी दाखविले नाही.

Web Title: Garbage management at the Godda Ashramshala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.