चंद्रपुरातील बागेची नासधूस
By admin | Published: July 17, 2015 12:50 AM2015-07-17T00:50:45+5:302015-07-17T00:50:45+5:30
स्थानिक नागपूर महामार्गावरील खत्री-पोटदुखे लेआऊटजवळील खुल्या जागेवर नागरिकांनी गेल्या सहा वर्षांपासून बगिचा तयार केला.
चंद्रपूर : स्थानिक नागपूर महामार्गावरील खत्री-पोटदुखे लेआऊटजवळील खुल्या जागेवर नागरिकांनी गेल्या सहा वर्षांपासून बगिचा तयार केला. मात्र मंगळवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकांनी बगिच्याची नासधूस करुन झाडांची कत्तल केली. याप्रकरणी येथील रहिवाश्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
स्थानिक जनता बी.एड महाविद्यालयासमोरील खत्री- पोटदुखे लेआऊटलगतच्या पश्चिम बाजूला असलेल्या खुल्या जागेवर येथील रहिवाश्यांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून बगीचा तयार केला. बगीच्यात परिसरातील नागरिक विरंगुळा म्हणून सकाळ-संध्याकाळी फिरायला जातात. ज्येष्ठ नागरिकांसाठीही हा बगीचा एक पर्वणीच ठरला आहे. बगीचाला लागूनच इदगाहाचे पवित्र राखण्यासाठीही बगीचा मोलाचा ठरत आहे. मागील सहा वर्षांपासून या बगीचाची देखभाल येथील नागरिक करीत आहेत. मात्र मंगळवारच्या रात्री अज्ञात समाजकंटकांनी या बगिचातील झाडांची कत्तल करुन तोडफोड केल्याचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान संतप्त झालेल्या नागरिकांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली आहे. समाजकंटकाविरुद्ध कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.
सोबत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी सुद्धा या प्रकरणात दखल द्यावी याकरीता निवेदन देण्यात आले आहे. यावेळी डॉ. सुनील भट, शंभु कुमावत, अनिल काळे, श्रीधर दत्तात्रेय, सुरेश ठावरी, दादाजी चल्लावार, के. आर. देवाळे, कमला जाखोटिया, नाहीन शेख, प्रसाद तामण, रविंद्र सिंग सलुजा, मुसानी, बी. टी. गुंबडे, बी. के. दोषी, जे. पी. बाहेश्वार, पियूष दत्तात्रेय, प्रविण साखरकर आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)