गॅस एजन्सीने ग्राहकांना सुविधा पुरवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 11:28 PM2018-08-12T23:28:24+5:302018-08-12T23:28:47+5:30
देशातील प्रत्येक व्यक्तीचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र्र व राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना हे या दिशेने उचललेले पाऊल आहे. या योजनेच्या माध्यमातून लाखो कुटुंबीयांना गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिले. ग्रामीण महिलांना धुरमुक्त करून त्यांचे जीवन आरोग्यदायी ठेवण्याचे कार्य जोमाने सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: देशातील प्रत्येक व्यक्तीचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र्र व राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना हे या दिशेने उचललेले पाऊल आहे. या योजनेच्या माध्यमातून लाखो कुटुंबीयांना गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिले. ग्रामीण महिलांना धुरमुक्त करून त्यांचे जीवन आरोग्यदायी ठेवण्याचे कार्य जोमाने सुरू आहे. त्यामुळे नवनिर्मित गॅस एजन्सीने ग्राहकांच्या आकांक्षांचे प्रतीक व्हावे. त्यांची अडवणूक करू नये, असे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. शनिवारी भद्रावती तालुक्यातील मुधोली येथील कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माजी मंत्री संजय देवतळे, जि.प. सभापती अर्चना जिवतोडे, भाजपा तालुका अध्यक्ष तुळशिराम श्रीरामे, जि.प. सदस्य मारोती गायकवाड, जि.प. सदस्य प्रवीण सुर, माजी जि.प. सदस्य विजय वानखेडे, नरेंद्र जिवतोडे, रवींद्र गुरूनुले, लोचन वानखेडे, यादव लेनगुरे, माणिकराव लेनगुरे, सरपंच गायत्री बागेसर, बेबी चावरे, मंजु लेनगुरे, दत्ता लेनगुरे आदी उपस्थित होते. मुधोली, चंदनखेडा व अन्य गावांतील महिलांना मान्यवरांच्या हस्ते गॅस कनेक्शन वितरण करण्यात आले.
ना. अहीर म्हणाले, गॅस एजन्सीने ग्राहकाभिमुखतेला अधिक महत्त्व दिले पाहिजे. सिलिंडरधारकांना उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करावा. विनापरवाना पाच सिलेंडर गावात राखीव ठेवण्याची एचपी कंपनीची परवानगी घ्यावी. गरजु नागरिकांन वेळेवर अडचण निर्माण होणार नाही. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेमुळे जंगल तोडीच्या प्रकारावर अंकुश बसला. महिलांची विवंचना दूर झाली, असेहीे त्यांनी सांगितले. ५५ गावांना किमान १५ लाखांचा विकास निधी देण्याचे प्रस्तावित असून प्रकल्पबाधीत गावांमध्ये आरो वॉटर एटीएम सुविधा उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही त्यांनी कार्यक्रमाप्रसंगी दिली. यावेळी परिसरातील सरपंच उपस्थित होते.