चंद्रपूर वायुगळती प्रकरण; स्वत:च्या घरातला 'तिचा' पहिला दिवस ठरला शेवटचा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 08:19 PM2021-07-13T20:19:12+5:302021-07-13T20:21:43+5:30
Chandrapur news म्हणतात ना, आयुष्य हे क्षणभंगूर आहे. कोणीही आपल्या आयुष्याची हमी देऊ शकत नाही. दुर्गापुरात घडलेली घटना अशीच काहीशी आहे. सोमवारची रात्र जगण्यासाठी धडपडणाऱ्या लष्करे कुटुंबासाठी काळरात्र ठरेल, असा विचार कुणीही केला नव्हता.
राजेश भोजेकर
चंद्रपूर : म्हणतात ना, आयुष्य हे क्षणभंगूर आहे. कोणीही आपल्या आयुष्याची हमी देऊ शकत नाही. दुर्गापुरात घडलेली घटना अशीच काहीशी आहे. सोमवारची रात्र जगण्यासाठी धडपडणाऱ्या लष्करे कुटुंबासाठी काळरात्र ठरेल, असा विचार कुणीही केला नव्हता. अखेर नियतीने डाव साधलाच.
रमेश लष्करे हे पेटी कंत्राटदार. लहानसहान कामे करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. यामुळे घरची परिस्थिती समाधानकारक होती. घरात आनंदाचे वातावरण. २८ जूनला मोठा मुलगा अजयचा विवाह झाला. नववधू आल्यानंतर घरातला आनंद दि्वगुणीत झाला. पण, या आनंदाला कुणाची नजर लागावी, असेच घडले. अजयची पत्नी माधुरी ही लग्नानंतर माहेरी गेली होती. ती घरात यावी आणि असे घडावे, यात तिचा काय दोष? मोठ्या आनंदात नववधू सोमवारी सासरी आली. हा दिवस तिच्यासाठी पहिला आणि शेवटचा दिवस ठरावा, ही कल्पनाही कोणी करू शकत नाही. मात्र नियतीनेच हा डाव रचला होता.
एखाद्या चित्रपटात घडावे याप्रमाणे घरात सर्वकाही सुरळीत असताना, रात्री ८ वाजताच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. येथूनच नियतीने आपला खेळ सुरू केला. पावसातच त्या परिसरातील रोहित्रात बिघाड होऊन ते जळाले. थोड्या वेळाने वीज येईल, म्हणून डोळ्यात तेल टाकून लष्करे कुटुंबीय रात्री १२ वाजेपर्यंत वाट बघत होते. पण वीज आलीच नाही. कुटुंबप्रमुख या नात्याने रमेश लष्करे हे अस्वस्थ होते. कुटुंबातील सदस्यांना निवांत झोपलेले पाहून कोणत्याही कुटुंबप्रमुखाला यापेक्षा दुसरा आनंद नसतो आणि घरात नववधू आलेली असताना, तिला अंधारात ठेवणे हे त्यांना खटकणारे होते. त्यामुळे रात्री १२ वाजता त्यांनी अडगळीत पडलेले जनरेटर बाहेर काढले. ते सुरू करण्यासाठी त्यांनी रात्री धडपड करून पेट्रोल आणले. अखेर जनरेटर सुरू झाले. घरातील वीजदिवे प्रकाशमान झाले. पण हा प्रकाशच कुटुंबात कायम अंधार आणणारा ठरला. सर्व कुटुंबीय झोपी गेले. डोळ्यात झोप असल्यामुळे लगेच झोप लागली. अखेर काळाने डाव साधला.
सकाळी लवकर उठणारी ही मंडळी, आज कोणीच कसे नाही उठले? म्हणून शेजाऱ्यांनी घरात डोकावून बघितले. पण आतील जे दृष्य दिसले, ते धक्कादायक होते. कुटुंबातील सर्व सदस्य गाढ झोपेत असल्यागत मृत्युमुखी पडलेले होते. रमेश लष्करे यांची पत्नी दासू यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. त्यांना लगेच रुग्णालयात हलविण्यात आले. त्या बेशुद्धावस्थेत होत्या. या घटनेत कुटुंब प्रमुखासह तीन मुले, एक मुलगी आणि मुलाची नववधू यांच्यावर काळाने झडप घातली. या घटनेने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.