चंद्रपूर जिल्ह्यातील गोधन कसायाच्या दारी

By admin | Published: July 17, 2015 12:49 AM2015-07-17T00:49:42+5:302015-07-17T00:49:42+5:30

दुबार पेरणीच्या संकटाने खचून गेलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीपायी आता गोधनही जड वाटू लागले आहे.

Gauda auspicious in Chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यातील गोधन कसायाच्या दारी

चंद्रपूर जिल्ह्यातील गोधन कसायाच्या दारी

Next

छाया दुष्काळाची: सोसावी लागणार चारा टंचाईची झळ
संतोष कुंडकर चंद्रपूर
दुबार पेरणीच्या संकटाने खचून गेलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीपायी आता गोधनही जड वाटू लागले आहे. कोरड्या दुष्काळात या गोधनाला जगवायचे कसे, अशा विवंचनेत अडकलेले शेतकरी आता या पाळीव जनावरांना मिळेल त्या किंमतीत कसायाच्या हवाली करीत आहे.
जीवती, कोरपनासह महाराष्ट्र, आंध्र सीमेवरील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर हा प्रकार सुरू आहे. गोधन विक्रीतून मिळालेल्या पैशात शेतकरी भविष्यातील काही दिवसांसाठी आर्थिक तडजोड करून ठेवत आहे. यंदा जून महिन्यातील काही दिवस वगळता, नंतर पावसाने दडी मारली. जुलै महिन्याचा पंधरवडा लोटला तरी अद्यापही पावसाचा पत्ता नाही. जून महिन्यात झालेल्या पावसाच्या भरवशावर पुढेही पाऊस येईलच, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी पेरण्या करून टाकल्या. मात्र नंतर पाऊस बेपत्ता झाला. आता जिल्ह्यातील पिकांची परिस्थिती अतिशय बिकट झाली असून त्यामुळे उत्पादनातही घट होणार आहे. त्यातच आता शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. काही शेतकऱ्यांनी तशी तयारी केली आहे. मात्र हाती पैसा नसल्याने व अगोदरच डोक्यावर कर्ज असल्याने बियाणांसाठी पैसे आणायचे कुठून, या प्रश्नाने अस्वस्थ झालेले शेतकऱ्यांनी आर्थिक गरज भागविण्यासाठी गोधन विक्रीचा पर्याय निवडला आहे.
कसायांकडून लूट
गोहत्या बंदी झाल्याने जनावरे खरेदी करण्यासाठी व्यापारी आढेवेढे घेत आहेत. शेतकऱ्यांची गरज हेरून हे व्यापारी अतिशय कमी किंमतीत जनावरांची बोली बोलत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना या व्यवहारातही आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
चारा टंचाईची झळ
यंदा पाऊसच न आल्याने यावर्षी दुष्काळामुळे भीषण चारा टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. जून महिन्यात झालेल्या दमदार पावसाने काही प्रमाणात चाऱ्याची उगवण झाली. परंतु नंतर पावसाने दडी मारली. तापमानात कमालिची वाढ झाल्याने उगवलेला चाराही करपून गेला.
छुप्या मार्गाने सुरू आहे खरेदी-विक्री
गोहत्या बंदी कायदा लागू झाल्यानंतर या कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे गाईंना कत्तलखान्यात पोहचविणारे कसायी हादरून गेले आहेत. त्यामुळे जनावरांची खरेदी विक्री छुप्या मार्गाने सुरू आहे.
पंधरवड्यात दोन कारवाया
जिल्ह्यातील गोधन मोठ्या प्रमाणावर आंध्रप्रदेशात नेले जात आहे. रात्रीच्यावेळी जनावरांना एखाद्या वाहनात कोंबून त्यांची निर्यात केली जात आहे. गेल्या पंधरवड्यात जनावरांची तस्करीच्या दोन घटना पोलिसांनी उजेडात आणल्या.

Web Title: Gauda auspicious in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.