बल्लारपूर पंचायत समितीचा हागणदारी मुक्तीबद्दल गौरव
By Admin | Published: May 2, 2017 01:04 AM2017-05-02T01:04:01+5:302017-05-02T01:04:01+5:30
गतवर्षी तालुक्यातील एकूण १७ ग्रामपंचायतींनी ग्रामीण स्वच्छता मिशनअंतर्गत उत्कृष्ट कार्य करून ....
ग्रामीण स्वच्छता अभियान : सभापती व बीडीओंचा सन्मान
बल्लारपूर : गतवर्षी तालुक्यातील एकूण १७ ग्रामपंचायतींनी ग्रामीण स्वच्छता मिशनअंतर्गत उत्कृष्ट कार्य करून लोकसहभागातून आठ हजारांवर नागरिकांनी वैयक्तिक शौचालयांचे बांधकाम केले. त्यामुळे बल्लारपूर तालुका हागणदारीमुक्त अभियानात विदर्भात पहिला ठरला. या कार्याबद्दल शनिवारी चंद्रपूर येथील चांदा क्लब मैदानावर बल्लारपूर पंचायत समितीचे सभापती गोविंदा पोडे व संवर्ग विकास अधिकारी भुजंगराव गजभे यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
राज्य शासन व जिल्हा परिषदेच्या वतीने चांदा क्लब ग्राऊंडवर जिल्ह्यातील जिल्हा परिषद डिजिटल शाळा साहित्य वितरण, हागणदारीमुक्त पंचायत समित्या व ग्रामपंचायतींचा गौरव समारंभ, दिव्यांग व सिंचन विभागाच्या वेबसाईटचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे होत्या. त्यांच्या हस्ते बल्लारपूर पंचायत समितीचे सभापती गोविंदा पोडे व संवर्ग विकास अधिकारी बी.बी. गजभे, उपसभापती इंदिरा पिपरे, पंचायत समिती सदस्य विद्या गेडाम, सोमेश्वर पद्मगिरीवार, जिल्हा परिषद सदस्य अॅड. हरीश गेडाम, वैशाली बुध्दलवार यांचा गौरव करण्यात आला. यावेळी आ. नाना शामकुळे, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, सभापती संतोष तंगडपल्लीवार, ब्रीजभूषण पाझारे, गोदावरी केंद्रे, अर्चना जीवतोडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे आदी उपस्थित होते.
ना. मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्हा विकासाभिमुख करण्याचे ध्येय असून आदर्श जिल्हा निर्मितीचा संकल्प आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळा डिजिटल करण्याचा मानस असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अद्यावत तंत्रज्ञानयुक्त शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करीत आहे. (शहर प्रतिनिधी)