गवराळा-घुग्घुस मार्ग दुपदरी करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:30 AM2021-09-25T04:30:03+5:302021-09-25T04:30:03+5:30
भद्रावती : तालुक्यातील गवराळा ते घुग्घुसमार्गे पिंपरी देशमुख हा मार्ग दुपदरीकरण करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. ...
भद्रावती : तालुक्यातील गवराळा ते घुग्घुसमार्गे पिंपरी देशमुख हा मार्ग दुपदरीकरण करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या मार्गावर अत्यंत वर्दळ राहत असल्याने अडचण जाते.
कठड्याअभावी अपघाताचा धोका
कोरपना : कोरपना- गोविंदपूर- आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग असल्याने जड वाहनांची वर्दळ सुरू असते. याच मार्गावर धामणगाव येथे पूल बांधण्यात आला; परंतु कठडे नसल्याने अपघाताचा धोका आहे. यापूर्वी येथे अपघात घडले असल्याचे वास्तव आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
जुन्या वाहनांची तपासणी करा
ब्रह्मपुरी : शहरात कोळसा खाणी, तसेच वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे यावर आळा घालणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, जुन्या वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने प्रदूषण वाढले आहे.
बार्टीचे मोफत प्रशिक्षण राबवावे
चंद्रपूर : कोरोनामुळे शिकवणी वर्ग बंद असल्याने मागील वर्षी बार्टीतर्फे मोफत स्पर्धा परीक्षेचे शिकवणी वर्ग घेण्यात आले होते. कोरोनाने अद्यापही शिकवणी वर्ग घेण्यास मुभा नसल्याने यंदाही बार्टीतर्फे मोफत प्रशिक्षण राबविण्याची मागणी होत आहे.
तारसा येथील नाल्यांचा उपसा करा
वढोली : गोंडपिपरी तालुक्यातील तारसा बुज येथील वॉर्ड नं. २ सह इतर वाॅर्डामधील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या तुडुंब आहेत. त्या नाल्याचा उपसा करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी
चंद्रपूर : गणेशोत्सव संपला असला तरी अकरपोक्या गणपतीची स्थापना अनेक ठिकाणी करण्यात आली आहे. त्यामुळे मंडपामध्ये अनेक युवक गर्दी करून रात्रभर जागरण करीत असतात. आता जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवून गर्दीवर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे; अन्यथा कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्राध्यापक भरती राबविण्याची मागणी
चंद्रपूर : मागील अनेक वर्षांपासून प्राध्यापक भरती बंद आहे. त्यामुळे अनेक महाविद्यालयांत पात्रताधारक प्राध्यापक तासिका तत्त्वावर अध्यापन करीत आहेत. कोरोनामुळे महाविद्यालये बंद आहेत. परिणामी, तासिका तत्त्वावर अध्यापन करणारे प्राध्यापक बेरोजगार आहेत. प्राध्यापक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून उच्चविद्याविभूषित असूनही त्यांना नोकरीसाठी दारोदार फिरावे लागत आहे.
कोरोना चाचणी वाढविण्याची मागणी
चंद्रपूर : मागील काही दिवसांत जिल्ह्यात कोरोनाने डोके वर काढले आहे. विविध सणांना सुरुवात झाल्याने बाजारपेठही गर्दीने फुलली आहे. मात्र, सद्य:स्थितीत अनेक ठिकाणची कोरोना चाचणी केंद्रे बंद झाली आहेत. त्यामुळे अनेक जण कोरोनाची चाचणी करण्यास जाऊन परत येत आहेत. ग्रामीण भागात हा प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना चाचणी केंद्र पुन्हा सुरू करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.