विविध विषयांवर आमसभेत गदारोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 12:32 AM2019-08-01T00:32:05+5:302019-08-01T00:32:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : अनेक दिवसानंतर झालेली महानगरपालिकेची आमसभा आज विविध मुद्यांवरून चांगलीच वादळी ठरली. अनेक विषयांवर सत्ताधारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अनेक दिवसानंतर झालेली महानगरपालिकेची आमसभा आज विविध मुद्यांवरून चांगलीच वादळी ठरली. अनेक विषयांवर सत्ताधारी व विरोधी पक्षात वादंग उठला. मात्र कोणत्याही विषयावर विस्तृत चर्चा न करता महापौरांनी अनेक प्रस्तावांना हिरवी झेंडी दाखविली. केवळ एका तासातच आणि वादंगात ही आमसभा गुंडाळण्यात आली.
चंद्रपूर महानगरपालिकेची आमसभा आज दुपारी १ वाजता मनपाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. सभेच्या प्रारंभी नवनिर्वाचित नगरसेवक कलावती यादव व प्रदीप किरमे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर आजच सेवानिवृत्त झालेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली आंबटकर यांचा महापौर अंजली घोटेकर यांनी सत्कार केला. फेन इंडियाच्या वतीने विश्वातले सर्वात लोकप्रिय मंत्री म्हणून निवड झालेले सुधीर मुनगंटीवार व आपल्या कार्याने मनपाला आंतराराष्टÑीय प्रसिध्दी मिळवून देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली आंबटकर यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव सर्वानुमते पारित करण्यात आला.
त्यानंतर मागील सभेतील वडगाव येथील शेती नान कृषक करण्याचा विषय पुन्हा चर्चेसाठी आला. त्याला नगरसेवक देवेंद्र बेले, नंदू नागरकर, राहुल घोटेकर, सुरेश महाकूळकर, अशोक नागापुरे, कुशल पुगलिया यांनी विरोध दर्शविला. यावर सभागृहात चांगलच गदारोळ झाला. त्यानंतर मागील सभेतील प्रस्ताव क्रमांक ९४ म्हणजे पार्कसाठी आरक्षित असलेल्या भूखंडातील काही जमीन रहिवासी करण्याबाबतचा विषय सभागृहात आला.
त्यालाही या नगरसेवकांनी विरोध दर्शविला. हॉटेल ट्रायस्टार ते ताडोबा प्रस्तावित बायपास रोड रद्द करण्यासंदर्भातील प्रस्ताव चर्चा न करताच मंजूर झाल्याची घोषणा महापौर अंजली घोटेकर यांनी केली. त्याला नगरसेविका सुनिता लोढिया आणि काही नगरसेवकांनी जोरदार विरोध केला. अमृत योजनेमुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे, याकडे नगरसेवक सचिन भोयर यांनी लक्ष वेधले. या संदर्भातील बॅनर घेऊनच ते सभागृहात आले व कंत्राटदाराविरोधात घोषणाबाजी केली.