पाच मिनिटातच पाच ठराव मंजूर करून गुंडाळली सर्वसाधारण सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 05:00 AM2021-12-01T05:00:00+5:302021-12-01T05:00:42+5:30
मंगळवारी मनपाच्या राणी हिराई सभागृहात सर्वसाधारण आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, आयुक्त राजेश मोहिते उपस्थित होते. दुपारी १ वाजता सभेला सुरुवात होताच माजी महापौर अंजली घोटेकर यांनी चंद्रपूर मनपाला स्वच्छतेत ३ स्टार मिळाल्याने अभिनंदनाचा ठराव मांडला. यावर काँग्रेसच्या नगरसेविका सुनिता लोढिया यांनी आक्षेप घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सभागृहात कोणतीही चर्चा न करता केवळ पाच मिनिटात पाचही ठराव मंजूर करून महापौरांनी सभागृह सोडताच आमसभा गुंडाळण्यात आल्याचा अफलातून प्रकार मंगळवारी महानगरपालिकेत घडला. दरम्यान, सभेत उपस्थित झाल्याची स्वाक्षरीदेखील न घेताच आमसभा संपविण्यात आली. हा सर्व प्रकार आर्थिक गैरव्यवहार दडपण्यासाठीच आटापिटा असल्याचा आरोप काँग्रेस विरोधी नगरसेवकांनी केला आहे.
मंगळवारी मनपाच्या राणी हिराई सभागृहात सर्वसाधारण आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, आयुक्त राजेश मोहिते उपस्थित होते. दुपारी १ वाजता सभेला सुरुवात होताच माजी महापौर अंजली घोटेकर यांनी चंद्रपूर मनपाला स्वच्छतेत ३ स्टार मिळाल्याने अभिनंदनाचा ठराव मांडला. यावर काँग्रेसच्या नगरसेविका सुनिता लोढिया यांनी आक्षेप घेतला. शहरात अस्वच्छता, डुकर व मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरू असून, परिस्थिती गंभीर असल्याचे निदर्शनास आणून दिले; मात्र महापौरांनी लोढिया यांच्याकडे कानाडोळा करून पटापट सर्व विषयांचे वाचन करून पाच मिनिटातच ठराव मंजूर केले. नगरसेवक पप्पू देशमुख यांनी कचरा संकलन व वाहतुकीच्या निविदा प्रक्रियेतील गैरव्यवहाराचे पुरावे सभागृहात सादर केले. दरम्यान, १०० कोटींच्या कचरा संकलन व वाहतुकीच्या निविदा प्रक्रियेची चर्चा टाळण्यासाठी महापौर राखी कंचर्लावार यांनी सभा गुंडाळून बाहेर निघून गेल्या, असा आरोप नगरसेविका सुनीता लोढिया यांनी केला आहे. कॉंग्रेसचे नगरसेवक देवेंद्र बेले यांनीही सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.
गैरव्यवहारावर बोलूच न देण्याची खेळी
- विशेष म्हणजे सभागृहात उपस्थित नगरसेवकांच्या हजेरी बुकावर स्वाक्षरी झाल्या नसताना पाच मिनिटात सत्ताधारी भाजपने सर्व ठराव मंजूर केले. या प्रकाराने संतापलेले काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर यांनी हजेरी बुक फेकून दिले. नगरसेवकांच्या उपस्थितीची नोंद झालेली नसताना ठराव मंजूर करणे बेकायदेशीर असल्याचा आरोप करून अन्य नगरसेवकांनीही महापौरांच्या कृतीचा निषेध केला. आजच्या प्रकरणात आयुक्त राजेश मोहिते यांची भूमिका संशयास्पद असून गैरव्यवहारावर नगरसेवकांना बोलूच न देण्यासाठी सभा गुंडाळली, असा आरोपही नगरसेविका सुनीता लोढिया यांनी केला आहे.
रामाळा उद्यानाच्या हस्तांतरणाचा ठराव
रामाळा तलाव उद्यान व तलावाचे व्यवस्थापन महसूल विभागाकडून मनपाकडे हस्तांतरीत करून शासनाने ५० कोटींचा निधी देण्याचा ठराव मनपाने मंजूर केला. मागील सभेचे कार्यवृत्त वाचून पक्के करणे, मुला-मुलींच्या गुणोत्तर प्रमाणाचा अहवाल सादर करण्यात आला. याशिवाय मनपा हद्दीतील विविध मार्ग, चौक आणि उद्यानाच्या नामकरणाचाही ठराव मंजूर झाला.