सामान्य रुग्णालयात आरोग्य सेवेचे धिंडवडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 11:47 PM2017-09-08T23:47:44+5:302017-09-08T23:50:13+5:30
चंद्रपूर औद्योगिक जिल्हा आहे. जडवाहतूक, उद्योगांचे प्रदूषण यामुळे अलीकडच्या काळात रुग्णात मोठी वाढ झाली आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील ओपीडीमध्ये दररोज दीड हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे.
नरवी जवळे, परिमल डोहणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर औद्योगिक जिल्हा आहे. जडवाहतूक, उद्योगांचे प्रदूषण यामुळे अलीकडच्या काळात रुग्णात मोठी वाढ झाली आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील ओपीडीमध्ये दररोज दीड हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या कार्यरत डॉक्टर आपापल्या विषयात तज्ज्ञ आहेत, यात शंका नाही. मात्र सक्षम यंत्रणेचा अभाव असल्याने रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे. चक्क जमिनीवर चादर टाकून, तिथेच रुग्णाला उपचार करवून घ्यावा लागत आहे.
औद्योगिकीकरणामुळे विदर्भात चंद्रपूर जिल्ह्याचे महत्त्व वाढले आहे. लोकसंख्येने जिल्हा मोठा आहे. वाढत्या उद्योगांमुळे अलिकडच्या काळात विविध आजारातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी त्या दृष्टीने चंद्रपुरातील जिल्हा सामान्य रुग्णालय अद्यापही प्रशस्त व सर्व सोई-सुविधायुक्त झालेले नाही. या सामान्य रुग्णालयात सध्या ३२० खाटा उपलब्ध आहेत. दररोज ४०० ते ५०० रुग्णांना या दवाखान्यात अॅडमीट करावे लागते. ओपीडीमध्ये दररोज दीड हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत असल्याचे रेकॉर्डवरून समजते.
खाटा कमी असल्याने सहाजिकच एका खाटेवर दोन-दोन रुग्णांना ठेवले जात आहे. आधीच वेदनेने विव्हळत असलेला रुग्ण आरोग्य विभागाच्या अशा समायोजनेमुळे आणखी त्रस्त होत आहे. अनेक रुग्णांना तर बेडही मिळत नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील भोंगळ कारभाराबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर लोकमत चमूने आज शुक्रवारी रुग्णालयात फेरफटका मारला. यावेळी स्थिती विदारक असल्याचे दिसून आले. अनेक रुग्ण जमिनीवर चादर टाकून उपचार करताना दिसून आले. एका रुग्णाला तशाच अवस्थेत सलाईन लावून ठेवण्यात आली होती. पिण्याच्या पाण्याची सोय तोकडी असल्याचे अनेक रुग्णांच्या नातलगांनी लोकमतशी बोलताना सांगितले. वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेकांवर वेळीच उपचारही मिळत नाही. त्यामुळे रुग्ण दगावल्याचा घटना होत आहेत.
रुग्णालयाच्या भिंती रंगलेल्या
जिल्हा सामान्य रुग्णालयातील भिंती मोठ्या प्रमाणात रंगलेल्या आहेत. रुग्णालयात येणाºया रुग्णासोबत असणारे नातेवाईक खर्रे खाऊन रुग्णालयात वावरत असतात. मात्र याकडे कर्मचाºयांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे ते रुग्णालयात थुंकत असतात. त्यामुळे रुग्णालयातील संपूर्ण भिंती रंगलेल्या दिसून आल्या.
माहिती देण्यास टाळाटाळ
चंद्रपुरातील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्याबाहेरुन अनेक रुग्ण उपचारांसाठी येत असतात. त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईकसुद्धा येत असतात. मात्र रुग्ण, त्याचा आजार याविषयी काही माहिती विचारण्यास गेले असता कर्मचारी व येथील अधिकारी वर्ग टाळाटाळ करतात. कुणाचा कुणाला मेळ नसतो. त्यामुळे नातेवाईकांना कुणाला माहिती विचारावी, याबाबत सभ्रम निर्माण होत असते.
औषधांचा अभाव
मोफत उपचार मिळत असल्यामुळे जिल्ह्यातील तसेच जिल्हाभरातील अनेक रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येत असतात. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यातही येतो. मात्र अपुºया औषधसांठ्यामुळे बरेचदा रुग्णांना पैसे खर्च करुन बाहेरच्या मेडीकलमधून औषधी खरेदी करावी लागते. त्यामुळे रुग्णांंना आर्थिक फटका बसत असतो.नातेवाईकांसाठी व्यवस्थाच नाही
रुग्णालयात रुग्णासोबत त्याचे नातलगही येतात. मात्र रुग्णालयात केवळ एकालाच राहण्याची परवानगी दिली जाते. रुग्णासोबत असणाºया इतर नातेवाईकांना बाहेरच राहावे लागते. झाडाखाली किंवा जमिनीवरच त्यांना झोपावे लागते.
दररोज रुग्णालयात दीड ते दोन हजारांच्या जवळपास रुग्ण येत असतात. त्यापैकी ४०० ते ५०० रुग्ण भरती असतात. त्यामुळे बहुतेक रुग्णांना बेड उपलब्ध होऊ शकत नाही. तरीसुद्धा आम्ही रुग्णांवर तत्परतेने उपचार करीत असतो.
- डॉ. यू. व्ही. मुनघाटे, निवासी वैद्यकीय अधिकारी, सामान्य रुग्णालय, चंद्रपूर.