गर्दीवर नियंत्रण मिळवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:31 AM2021-09-12T04:31:53+5:302021-09-12T04:31:53+5:30
पीक नोंदणीचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे चंद्रपूर : आता शेतकऱ्यांना मोबाइलद्वारे स्वत:च्या शेतातील पिकांचे नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करता येत आहे. ...
पीक नोंदणीचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे
चंद्रपूर : आता शेतकऱ्यांना मोबाइलद्वारे स्वत:च्या शेतातील पिकांचे नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करता येत आहे. मात्र, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोबाइलचे पुरेसे ज्ञान नसल्याने त्यांना नोंदणी करण्यास अडचण जात आहे, तसेच ग्रामीण भागात नेटवर्कची समस्याही मोठ्या प्रमाणात उद्भवत असल्याने अद्यापही अनेक शेतकऱ्यांनी पीक नोंदणी केली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक नोंदणी संदर्भात प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी होत आहे.
पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी
चंद्रपूर : शहरात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणरायाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे मंडपामध्ये अनेक युवक गर्दी करून रात्रभर जागरण करीत असतात. आता जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवून गर्दीवर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे, अन्यथा कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्राध्यापक भरती राबविण्याची मागणी
चंद्रपूर : मागील अनेक वर्षांपासून प्राध्यापक भरती बंद आहे. त्यामुळे अनेक महाविद्यालयांत पात्रताधारक प्राध्यापक तासिका तत्त्वावर ज्ञानार्जन करीत आहेत. कोरोनामुळे महाविद्यालये बंद आहेत. परिणामी, तासिका तत्त्वावर अध्यापन करणाऱ्या प्राध्यापक बेरोजगार आहेत. प्राध्यापक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून उच्च विद्या विभूषित असूनही त्यांना नोकरीसाठी दारोदार फिरावे लागत आहे.
कोरोना चाचणी वाढविण्याची मागणी
चंद्रपूर : मागील काही दिवसांत जिल्ह्यात कोरोनाने डोके वर काढले आहे. गणेशोत्सव सुरू असल्याने बाजारपेठही गर्दीने फुलली आहे. मात्र, सद्यस्थितीत अनेक ठिकाणचे कोरोना चाचणी केंद्र बंद झाले आहेत. त्यामुळे अनेक जण कोरोनाची चाचणी करण्यास जाऊन परत येत आहेत. ग्रामीण भागात हा प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना चाचणी केंद्र पुन्हा सुरू करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
लहान मुलांचे लसीकरण करण्याची मागणी
चंद्रपूर : कोरोना तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, त्याचा सर्वाधिक धोका लहान मुलांना होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मात्र, अद्यापही लहान बालकांचे लसीकरण पूर्ण झाले नाही. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लहान मुलांचे लसीकरण सुरू करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
ग्रामीण भागात दारूची अवैध विक्री सुरूच
चंद्रपूर : मागील सहा वर्षांपासून बंद असलेली दारू सुरू करण्यात आली आहे. मात्र, तरीही अनेक जण दारूची अवैध विक्री करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषत: ग्रामीण भागात अनेक जण दुचाकी किंवा चारचाकी वाहन घेऊन जातात. तिथेचे दारूची विक्री केली जाते. मात्र, याकडे पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. या व्यवसायात १८ वर्षांखालील मुलेही गुंतली आहेत. त्यामुळे पोलीस विभागाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.