मागणी करा, व्यायाम शाळा मिळवा !
By Admin | Published: December 27, 2014 10:47 PM2014-12-27T22:47:28+5:302014-12-27T22:47:28+5:30
शरीर सुदृढ आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रत्येकांना व्यायामाची गरज आहे. मात्र स्पर्धेच्या युगामध्ये बहुतांश नागरिक व्यायामापासून दूर जात आहे. परिणामी आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहे.
साईनाथ कुचनकार - चंद्रपूर
शरीर सुदृढ आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रत्येकांना व्यायामाची गरज आहे. मात्र स्पर्धेच्या युगामध्ये बहुतांश नागरिक व्यायामापासून दूर जात आहे. परिणामी आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्याच्या समस्या सुटाव्यात, नवीन खेळाडू जिल्ह्यात निर्माण व्हावे, त्यांना क्रीडाक्षेत्राबद्दल आवड निर्माण व्हावी, यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने नवी योजना आखली आहे. ‘मागणी करा, व्यायाम शाळा मिळवा’ असा अनोखा प्रयोग आता राबविण्यात येत आहे.
शहरी तसेच ग्रामीण परिसरामध्ये नागरिक व्यायामापासून दूर जात आहे. काही खेळाडूंंना आवड असतानाही त्यांना क्रीडा साहित्य उपलब्ध नसते. अशावेळी त्यांना क्रीडाक्षेत्रापासून दूर रहावे लागते. मात्र आता ग्रामीण परिसरातील खेळाडूही क्रीडाक्षेत्रात मागे राहणार नाही. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने व्यायाम शाळा बांधकामासाठी सात लाख रुपयांपर्यंतचा निधी देण्याची योजना आखली आहे. एकाच टप्प्यामध्ये निधी देऊन प्रत्येक गावांत व्यायाम शाळा उभ्या करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायत किंवा संस्थांनी प्रस्ताव सादर करणे गरजेचे आहे. यापूर्वी ग्रामपातळीवर केवळ दोन लाख रुपयांचे अनुदान देण्यात येत होते. आता मात्र यात वाढ करण्यात आली आहे. यासाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मानसिकता असणे गरजेचे आहे. केवळ प्रस्ताव टाकून चालणार नाही तर गावातील नागरिक तथा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना क्रीडाक्षेत्रात आवड निर्माण करणे गरजेचे आहे. तेव्हाच योजनेचे फलित दिसून येईल.