ई-संजीवनीवर घ्या घरच्या घरी मोफत आरोग्य सल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:29 AM2021-05-12T04:29:04+5:302021-05-12T04:29:04+5:30
साईनाथ कुचनकार चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोनाने हाहाकार माजवला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा वेळी प्रत्येक जण ...
साईनाथ कुचनकार
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोनाने हाहाकार माजवला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा वेळी प्रत्येक जण आपल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. मात्र घराबाहेर पडल्यास आपल्याला कोरोनाची लागण होईल, या भीतीने नागरिक साध्या साध्या आजाराकडे दुर्लक्ष करीत आहेत. मात्र आता नागरिकांना काळजी करण्याची गरज नसून घरबसल्या तज्ज्ञ डाॅक्टरांकडून मोफत मार्गदर्शन घेता येणार आहे. एवढेच नाही तर डाॅक्टरांनी दिलेल्या ई-प्रिसक्रिप्शनद्वारे शासकीय रुग्णालयातून मोफत औषधसुद्धा मिळणार आहे. यासाठी ई-संजीवनी ॲप आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करून ओपीडीद्वारे डाॅक्टरांसोबत संपर्क साधावा लागणार आहे.
कोरोनामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यावर निर्बंध आले आहे. अशा वेळी कोरोना रुग्णांसह अन्य रुग्णांंचेही मोठे हाल होत आहेत. खासगी डाॅक्टरांकडे गेल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतो. तर शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी असते. अशा वेळी औषधोपचार कसा होईल, असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे. त्यामुळे प्रत्येकाने ई-संजीवनी ॲप डाऊनलोड करून आपल्याला झालेल्या आजाराबाबत ॲपच्या माध्यमातून व्हिडीओ तसेच चॅटिंगद्वारे तज्ज्ञ डाॅक्टरांचा सल्ला घेता येणार आहे. एवढेच नाही तर सदर डाॅक्टर आजारानुसार ई-प्रिसक्रिप्शन देणार असून शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांना मोफत औषधेही मिळणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक रुग्णांनी कोरोनाच्या काळामध्ये बाहेर जाऊन गर्दी करण्यापेक्षा तसेच खासगी किंवा इतर रुग्णालयात जाऊन आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा या ॲपच्या माध्यमातून घरच्या घरी आरोग्याबाबत सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील ३५० नागरिकांनी लाभ घेतला असून त्यांनी आरोग्यासंदर्भातील आपल्या तक्रारी या ॲपच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविल्या आहे. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांना त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून औषधेसुद्धा लिहून दिली आहेत.
बाॅक्स
या वेळेत करा संपर्क
या ॲपद्वारे आरोग्याच्या डाॅक्टरांकडून मोफत सल्ला घेण्यासाठी दररोज सकाळी ९ ते दुपारी १ आणि दुपारी १.४५ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपर्क साधता येणार आहे.
बाॅक्स
असा साधा संवाद
ई-संजीवनी ओपीडी सेवेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांना ई-संजीवनी ओपीडी डाॅट इन या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. त्यानंतर तज्ज्ञ डाॅक्टरांशी संवाद साधता येईल. ॲन्ड्राईड मोबाइलमध्ये गुगल प्ले-स्टोअरमध्ये जाऊन ई-संजीवनी ओपीडी नॅशनल टेलिकॅन्सुलेशन्स सर्व्हिस या नावाचे ॲप डाऊनलोड करावे लागेल.
बाॅक्स
२ हजार १०० डाॅक्टरांची नोंदणी
या संजीवनी ॲपमध्ये राज्यभरातील २ हजार १०० डाॅक्टरांची नोंदणी केली आहे. यामध्ये विविध तज्ज्ञ डाॅक्टरांचा समावेश आहे. संबंधित रुग्णांच्या व्याधीनुसार त्या-त्या डाॅक्टरांच्या वेळेत या रुग्णांना मोफत आरोग्यविषयक माहिती दिली जाते. या अभियानामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल ८६ डाॅक्टरांची नोंदणी केली असून या डाॅक्टरांनीही आपली सेवा सुरू केली आहे.
बाॅक्स
मोफत मिळणार औषध
या ॲपद्वारे संवाद साधल्यानंतर डाॅक्टर रुग्णांना त्यांच्या आजारानुसार औषध लिहून देतात. याबाबतचा मॅसेज आल्यानंतर संबंधित रुग्णांनी किंवा नातेवाइकांनी जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन मोफत औषधे घ्यायची आहेत.
बाॅक्स
मोबाइल नसलेल्या रुग्णांनी येथे करा संपर्क
ई-संजीवनी ॲपचा ज्यांच्याकडे ॲन्ड्राईल मोबाइल नाही, अशा रुग्णांना फायदा होणार नसल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. मात्र यावरही उपाय असून ज्या रुग्णांकडे ॲन्ड्राईड मोबाइल नसेल त्यांना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा गावातील आशा वर्करसोबत संपर्क साधून त्यांच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधून आपल्या आरोग्याबाबत सल्ला घेता येणार आहे.
बाॅक्स
घाबरू नका, सुरक्षित राहा
सध्या कोरोनाचा काळ सुरू आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक घाबरले आहेत. मात्र नागरिकांनी न घाबरता कोरोनावर तसेच इतर आजारांवरही मात करायची आहे. नागरिकांनी न घाबरता घरी राहा, सुरक्षित राहण्याचा सल्ला जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांच्यासह जिल्ह्यातील वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला असून, आपल्या प्रकृतीच्या उपचारांबाबत ई-संजीवनी या ॲपद्वारे नागरिकांनी तज्ज्ञ डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
बाॅक्स
जिल्ह्यात यांच्याद्वारे सुरू आहे जनजागृती
नॅशनल आरोग्य हेल्थ मिशनद्वारे सुरू असलेल्या ई-संजीवनीची जनजागृती तसेच नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात एक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यामध्ये फॅसिलिटी मॅनेजर म्हणून नयना चौके काम सांभाळत आहेत. तसेच वरोरा येथे दीपक खडसाने यांच्यासह सीपीएससी सल्लागार म्हणून संतोष चत्रेश्वर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शितल राजापुरे आदी काम सांभाळत आहेत.
कोट
ई-संजीवनी ॲपद्वारे नागरिकांना आपल्या आरोग्यासंदर्भात तक्रारींचे निराकरण करता येते. प्रत्येकासाठी ही सेवा मोफत असून याद्वारे रुग्णांना तज्ज्ञ डाॅक्टर आरोग्याबाबत सल्ला देऊन औषधोपचारही करतात. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा.
- राहुल कर्डिले, मुख्य कार्यपालन अधिकारी, चंद्रपूर