संविधान वाचविण्यासाठी संघटित व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 01:10 AM2018-02-18T01:10:50+5:302018-02-18T01:13:54+5:30
आरएसएसप्रणीत भाजप सरकार संविधान बदलविण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे संविधान वाचविण्यासाठी संघटीत होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भारिपचे प्रदेश अध्यक्ष अशोक सोनाने यांनी केले.
ऑनलाईन लोकमत
चंद्रपूर : आरएसएसप्रणीत भाजप सरकार संविधान बदलविण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे संविधान वाचविण्यासाठी संघटीत होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भारिपचे प्रदेश अध्यक्ष अशोक सोनाने यांनी केले.
स्थानिक राजाभाऊ खोब्रागडे सभागृहात भारिपचा कार्यकर्ता मेळावा व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्याचा सत्कार सोहळा शुक्रवारी पार पडला. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. सर्व पाहुण्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारिपचे जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे तर प्रमुख पाहुणे म्हणून भारिपचे सरचिटणीस अमित भुईगळ, महासचिव कुशाल मेश्राम, आ. बळीराम शिरस्कर, भारिपचे जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे, सचिव धिरज बांबोळे आदी उपस्थित होते.
यावेळी भारिपचे सरचिटणीस अमित भुईगळ म्हणाले, जनता भाजप, सनेच्या सत्तेला कंटाळली असून तिसरा पर्याय म्हणून भारिपकडे वळत आहे. त्यामुळे आपणाला पक्ष संघटन करणे गरजेचे आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.
आ. सिरस्कर यांनी डॉ. आंबेडकरांच्या संविधानामुळेच देशातील शोषित, पीडित जनता सन्मानाने जीवन जगत आहेत. मात्र सरकारच्या नव्या ध्येय धोरणामुळे जनसामान्यांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे आता आपले सरकार बसविणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी पक्षसंघटन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
भारिपचे महासचिव कुशल मेश्राम म्हणाले, राज्याच्या महासचिव पदी माझी नेमणूक करुन माझ्यावर माजी खा. बाळासाहेब आंबेडकरांनी जो विश्वास दाखविला तो विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्नरत राहणार आहे. तर पक्षवाढ करण्यासाठी आपण प्रयत्नरत असून जिल्ह्यामध्ये कार्यकर्ते तयार करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी भारिपच्या राज्य कार्यकारिणीमध्ये प्रदेशाध्यक्ष म्हणून अशोक सोनाने, सरचिटणीस अमित भुईगळ, महासचिव कुशाल मेश्राम, महासचिव आ. बळीराम शिरस्कर या सर्व नवनियुक्त कार्यकर्त्यांचा जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक चंद्रपूर जिल्हा महासचिव धिरज बांबोळे, संचलन सुभाष ढोलणे तर उपस्थिताचे आभार जे.जे.नगारे यांनी मानले. यावेळी कपूरदास दुपारे, डॉ. विलास मैद, सुरज गावंडे, रमेश ढेंगरे, सुमित मेश्राम, राजाभाऊ किर्तक, कल्पना अलोणे, राखी रामटेके, धिरज तेलंग, मिथून खोब्रागेड आदी उपस्थित होते.