आपल्या हक्कासाठी संघटित व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:45 PM2017-11-18T23:45:15+5:302017-11-18T23:45:44+5:30
ब्रह्मपुरी तालुक्यातील हजारो बांधकाम कामगारांना व रोजगार हमीवर काम करणाऱ्या मजुरांना इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून विविध शासकीय योजनेचा लाभ दिला जातो.
आॅनलाईन लोकमत
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील हजारो बांधकाम कामगारांना व रोजगार हमीवर काम करणाऱ्या मजुरांना इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून विविध शासकीय योजनेचा लाभ दिला जातो. परंतु प्रशासनाने या बाबत पाहिजे त्या प्रमाणात प्रत्यक्ष कामगारांना लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न केला नाही. परिणामी हजारो कामगार लाभापासून वंचित आहेत. या बांधकाम कामगारांना जागृत करून त्यांना त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी या तालुकास्तरीय नोंदणी मेळावा शुक्रवारी येथे पार पडला.
कामगारांनी आपला हक्क मिळविण्यासाठी कल्याणकारी महामंडळाकडे त्वरित नोंदणी करावी व संघटित होवून संघटनात्मक संघर्ष करण्याचे आवाहन बांधकाम कामगार संघटनेचे राज्य महासचिव संजय मंडवधरे यांनी केले.
आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती ब्रह्मपुरी येथे कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेश कोपूलवार, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष विनोद झोडगे, आयटकचे जिल्हाध्यक्ष संतोष दास, संघटनेचे तालुकाध्यक्ष नामदेव नखाते आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
बांधकाम कामगारांसाठी आयटक संघटना सातत्याने मोर्चे, धरणे आंदोलन करून सरकारशी भांडत आहे. शेवटी सरकारला इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी बोर्ड स्थापन करावे लागले व या माध्यमातून बांधकाम मजुरांसाठी अनेक योजना सुरू झाल्या आहेत. पण बांधकाम कामगार संघटित नसल्यामुळे त्यांना शासकीय योजनांची माहिती नाही. त्यामुळे बांधकाम कामगारांनी आपली नोंदणी त्वरित करून संघटनेच्या माध्यमातून अनेक योजना मिळविण्यासाठी संघर्ष करावा, असे डॉ. महेश कोपुलवार यांनी सांगितले.
नोंद होणाऱ्या व यापूर्वी नोंदीत असलेल्या बांधकाम कामगारांना प्रत्येकी पाच हजार रुपये देण्याचे मंडळाने जाहीर केले आहे. मिस्त्री, गवंडी, बिगारी, सेंट्रींगवाले, खुदाईवाले, पेंटर, प्लंबर, सुतार, फरशी फिटर, फेब्रीकेटर, इलेक्ट्रिक फिटर, वेल्डर, विटाभट्टी कामगार यांना लाभ मिळणार आहे.