शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अहिरकरांना ‘गेट आऊट’
By admin | Published: November 27, 2015 01:13 AM2015-11-27T01:13:56+5:302015-11-27T01:13:56+5:30
जिल्हा परिषद स्थायी समितीची गुरूवारी सभा झाली. या सभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हा परिषद सदस्य विनोद अहीरकर यांनी प्रश्न उपस्थित केला.
चंद्रपूर : जिल्हा परिषद स्थायी समितीची गुरूवारी सभा झाली. या सभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हा परिषद सदस्य विनोद अहीरकर यांनी प्रश्न उपस्थित केला. मात्र या प्रश्नाला जिल्हा परिषद अध्यक्षांनी उत्तर न देता चक्क त्यांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगितल्याचा प्रकार सभेत घडला. त्यामुळे विनोद अहीरकर यांनी सभागृहाच्या प्रवेशद्वारावर सभा संपेपर्यत ठिय्या आंदोलन केले. परिणामी स्थायी समितीची सभा चांगलीच गाजली.
स्थायी समितीची सभा सुरू झाली असता शेतकऱ्यांना बियाणे वाटप करण्यात जिल्हा परिषद कृषी विभाग मागे पडला, आदिवासी दलित शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहचवू शकले नाही आणि अनेक शेती साहित्याची खरेदीच झाली नसल्याचा मुद्दा जिल्हा परिषद सदस्य विनोद अहिरकर यांनी मांडला. मात्र अध्यक्ष संध्या गुरूनुले यांनी त्यांचे ऐकून न घेता, चक्क सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले. त्यावर अहिरकर यांनी आपली चूक काय, अशी विचारणा अध्यक्षांना केली. मात्र त्यांनी कोणतेच उत्तर दिले नाही. अखेर विनोद अहिरकर यांनी सभागृह सोडून प्रवेशद्वारावर बैठक मांडून ठिय्या दिला.
जिल्हा परिषद अध्यक्षांनी गेल्या सहा महिन्यात जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांना अनेक आदेश केलेत. मात्र एकाही आदेशाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पालन केले नाही. सभा अनेक झाल्या, चर्चा झाली. मात्र विरोधकांनी उपस्थित केलेले प्रश्न दडपले जातात, अध्यक्षांची मनमानी सुरु आहे, असा आरोप अहिरकर यांनी केला आहे.
१५ सप्टेंबरच्या सभेत बंडी खरेदीवर चर्चा झाली. मात्र यावेळी समिती गठित करण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र समिती गठित करण्यात आलीच नाही. जिल्हा परिषद अध्यक्षांनी खोटे बोलून समितीची चर्चा झाल्याचे सांगितले. यावर सभेमध्ये सचिवांना विचारणा केली असता ते निरूत्तर झाले. समाजकल्याण सभापती कोरांगे यांनीही यावर नाराजी व्यक्त केली.
गठित करण्यात आलेली समिती काहीच करू शकली नाही. जिल्हा परिषद अध्यक्ष आदेश करतात. मात्र त्या आदेशाचे पालन कुणीच करीत नाही, अशी परिस्थिती जिल्हा परिषदेत निर्माण झाली आहे. २०१५-१६ या वर्षात एकाही शेती साहित्याची खरेदी झाली नाही, त्यामुळे जिल्हा परिषदेचा कारभार नियोजनशून्य असल्याचा ठपका सदस्यांनी ठेवला. स्थायी समितीच्या सभेला उपाध्यक्ष कल्पना बोरकर, आरोग्य समिती सभापती ईश्वर मेश्राम, समाज कल्याण सभापती कोरांगे, महिला व बालकल्याण सभापती सरीता कुडे, सदस्य डॉ. सतीश वारजूकर, विनोद अहिरकर, डॉ. विजय देवतळे, भगत, पंकर पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याणकर व अधिकारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपण विनोद अहीरकर यांना गेट आऊट केले, हे खरे नाही. निकृष्ठ बैलगाडी वाटपासंदर्भात तीन तालुक्यांत नेमलेल्या चौकशी समितीसोबत आपणही भेटी दिल्या होत्या. यावरील चर्चेदरम्यान यांनी सभागृहात असंवैधानिक शब्दांचा वापर केला. त्यामुळे आपण त्यांना गेट आऊट केले.
-संध्या गुरुनुले
अध्यक्ष, जिल्हा परिषद