तिकीट मिळण्यापूर्वीच इच्छुक लागले प्रचाराला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 06:00 AM2019-09-24T06:00:00+5:302019-09-24T06:00:39+5:30
विधानसभा निवडणुकीत यंदा थेट मतदारांच्या गाठीभेटींना उमेदवारांकडून प्राधान्य दिले जाणार आहे. तसे नियोजन आखले जात आहे. मात्र, जनतेचा बदलता मूड लक्षात घेता, बहुतांश उमेदवारांनी सोशल मीडियाचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. सोशल मीडियावर तशा प्रकारचे ग्रुप तयार केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीसाठी २७ सप्टेंबरपासून नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ४ आॅक्टोबर नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने अद्याप आपापला उमेदवार अधिकृतरित्या जाहीर केलेला नाही. मात्र विद्यमान आमदार व डोक्याला बांधून असलेल्या इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच प्रचार करणे सुरू केले आहे. कार्यकर्त्यांच्या सभा, गावात कार्नर सभा घेऊन वातावरण निर्मिती केली जात आहे.
जिल्ह्यात चंद्रपूर, ब्रह्मपुरी, बल्लारपूर, चिमूर, राजुरा आणि वरोरा असे सहा विधानसभा क्षेत्र आहे. या सहाही विधानसभा क्षेत्रात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्याचे दिसून येत आहे. काही विद्यमान आमदारांना पक्ष एबी फार्म देईल, हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे त्यांनी आपला प्रचार आतापासूनच सुरू केला आहे. मात्र भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्टÑवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी यासह सर्वच पक्षांनी अद्याप आपला उमेदवार निश्चित केलेला नाही. मात्र अनेक इच्छुक उमेदवारी आपापल्याच मिळेल, या आशेवर प्रचाराला लागले आहेत. गावागावात कार्नर सभा घेतल्या जात आहे. याशिवाय हे उमेदवार कार्यकर्त्यांचीही मजबुत फळी तयार करीत आहेत. या कार्यकर्त्यांच्या बळावरच त्यांच्या निवडणुकीची यशस्वीता समोर येणार आहे, याची चांगली जाणीव उमेदवारांना आहे. त्यामुळे नाराज कार्यकर्त्यांचीही मनधरणी सुरू आहे.
सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर
विधानसभा निवडणुकीत यंदा थेट मतदारांच्या गाठीभेटींना उमेदवारांकडून प्राधान्य दिले जाणार आहे. तसे नियोजन आखले जात आहे. मात्र, जनतेचा बदलता मूड लक्षात घेता, बहुतांश उमेदवारांनी सोशल मीडियाचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. सोशल मीडियावर तशा प्रकारचे ग्रुप तयार केले जात आहे. सोशल मीडियाचे सध्या महत्त्व वाढले आहे. त्यामुळेच विविध राजकीय पक्षांनी या माध्यमाचा प्रभावी वापर करण्याचे ठरविले आहे. केलेल्या विकास कामांची माहिती, खेचून आणलेला निधी, अशा प्रकारची माहिती सोशल मीडियावरून जनतेपर्यंत आणली जात आहे. बहुतांश नवीन मतदारांकडे स्मार्ट मोबाईल आहेत, हे विशेष.
आचारसंहितेमुळे कामे अडली
विधानसभा निवडणूक घोषित झाल्यानंतर जिल्ह्यातील विविध विकास कामांना आचारसंहितेचा फटका बसत आहे. यामध्ये काही नागरिकांची प्रशासकीयस्तरावरील कामेही अडली आहेत. आचारसंहितेत विकास कामे नव्याने सुरू करता येत नाहीत. आचारसंहिता लागू झाल्यानंतर कामे सुरू केल्यास आचारसंहितेचा भंग होतो. त्यासाठी प्रशासन नियमाचे पालन करीत आहे. यामध्ये मात्र सामान्य नागरिकांचे काही कामे अडली आहे. विशेष म्हणजे, आचारसंहिता लागल्याने प्रशासकीय स्तरावरील अनेक कामांचा खोळंबा झाला.
वाहनांवरही असणार नजर
आता काही दिवसातच राजकीय पक्षांच्या बैठकांनाही वेग येणार आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांकरिता वाहने दिमतीला पाठविण्यात येतात. त्यामुळे या वाहनांवर प्रशासन लक्ष ठेवून आहे. निवडणूक आयोगाची मोठी फौज जिल्ह्यात कार्यरत असून त्यांची नजर या सर्व वाहनांवर आहे. जिल्हा निवडणूक विभागाने जिल्ह्यात पथकांच्या माध्यमातून निगराणी ठेवणे सुरू केले आहे. असे असले तरी जिल्ह्यात आजही काही वाहने अवैधरित्या फिरत असून अनेकांकडे वाहनांचे कागदपत्रेही नसल्याचेही बोलल्या जात आहे.