नगर पंचायतवर घागर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 10:34 PM2018-01-17T22:34:30+5:302018-01-17T22:35:22+5:30
मागील १९ दिवसापांसून सावलीतील जलप्राधिकरणाची नळयोजना बंद आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
आॅनलाईन लोकमत
सावली : मागील १९ दिवसापांसून सावलीतील जलप्राधिकरणाची नळयोजना बंद आहे. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे नळयोजना त्वरित सुरू करून पाण्याची सोय करावी, या मागणीसाठी मंगळवारी माजी उपसरपंच नरेंद्र डोहणे यांच्या नेतृत्वात महिलांचा घागर मोर्चा नगर पंचायतींवर धडकला.
सावली शहरात महाराष्ट्र जीवन प्राधीकरणच्या मार्फतीने शुद्ध पाणीपुरवठा करणारी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेची देखरेख नगर पंचायतीकडे आहे. मात्र मागील १९ दिवसांपासून ही नळयोजना बंद आहे. त्याचा नाहक त्रास येथील जनतेला सहन करावा लागत असल्याने संतप्त झालेल्या महिलांनी नगर पंचायतीवर घागर मोर्चा काढून रोष व्यक्त केला. या मोर्चात शहरातील शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, नरेंद्र डोहणे, विरोधी पक्षनेते नगरसेवक गुणवंत सुरमवार, देवलाबाई आलेवार, गेडाम आदी महिलांनी मोर्चामध्ये मार्गदर्शन केले. यावेळी नगर पंचायतीचे पाणीपुरवठा सभापती सेवेंद्र मडावी मोर्चेकºयांना सामोरे गेले. त्यानंतर शिष्टमंडळाद्वारे मुख्याधिकारी डॉ. माधुरी सलामे यांची भेट घेवून पाणी समस्या सोडवावी, शौचालय घोटाळ्याची विभागीय चौकशी करावी तसेच स्वच्छता अभियान राबवावे, अशी मागणी करण्यात आली. मुख्याधिकारी सलामे यांनी मागण्या मान्य करून उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. तसेच अल्पावधीतच नळ योजना सुरू होईल, असे सांगितले. यावेळी नगराध्यक्ष उपस्थित नसल्याने महिलांनी रोष व्यक्त केला. यावेळी ठाणेदार स्वप्निल धुळे यांचा नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.