पंचायत समितीवर घागर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 11:44 PM2018-12-09T23:44:39+5:302018-12-09T23:45:27+5:30
तालुक्यातील अकोला येथे पाण्याची तीव्र टंचाई आहे. मात्र, उपाययोजना करण्यात प्रशासनाला अपयश आले. त्यामुळे संतप्त महिलांनी पंचायत समिती कार्यालयावर घागर मोर्चा काढून संताप व्यक्त केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : तालुक्यातील अकोला येथे पाण्याची तीव्र टंचाई आहे. मात्र, उपाययोजना करण्यात प्रशासनाला अपयश आले. त्यामुळे संतप्त महिलांनी पंचायत समिती कार्यालयावर घागर मोर्चा काढून संताप व्यक्त केला आहे.
पारडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत अकोला गावाचा समावेश करण्यात आला आहे. परंतु, ही योजना पूर्णत्वास न आल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. उन्हाच्या दिवसात खासगी हातपंप अधिग्रहीत करुन पाणीपुरवठा करण्यात आला. परंतु, आता पाण्याची पातळी खालावल्याने हातपंप कोरडे पडले आहेत. त्यामुळे प्रशासनाने पाणीटंचाईवर कायमचा तोडगा काढावा, या मागणीसाठी महिलांनी पंचायत समितीवर घागर मोर्चा काढून संताप व्यक्त केला.
यावेळी संवर्ग विकास अधिकारी, तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आठ दिवसात समस्या सोडविण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. मोर्चात नारायण हिवकर, देवराव गेडाम, सोनू राजूरकर, शीला सोयाम, अर्चना जेऊरकर, राजू कोट्टावार, रमेश तुरणकर, सुधाकर न्याहारे, प्रवीण हंसकर, सत्यवान जेऊरकर, नीलेश जेऊरकर, प्रभावती न्याहारे, वैशाली न्याहरे, मनिषा धारतकर, अर्चना कुळमेथे, करिश्मा सोयाम, अनिता टोंगे, नंदा बोरकर, माधुरी हंसकर, शोभा तुरणकर, पुष्पा राजूरकर, साधना राजूरकर आदी सहभागी झाले होते.
सावलीतील फिल्टर नळ योजना बंद
सावली : जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत सुरु असलेली फिल्टर नळ योजना पुन्हा मागील पंधरा दिवसांपासून ठप्प झाली. त्यामुळे गावातील पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे. ढिसाळ कारभाराचा हा परिणाम असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. नगरपंचायतीमार्फत शहराला पाणीपुरवठा करण्याकरिता दोन योजना कार्यान्वित करण्यात आल्या. त्यात जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून फिल्टर नळ योजना आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून फिल्टर नळ योजना ही सतत बंद पडत आहे. शहराची लोकसंख्या जवळपास १५ हजार आहे. मात्र, सर्वांना पाणी पुरवठा करण्यास पाणीपुरवठा विभाग अपयशी ठरत आहे. फिल्टर नळ योजना केवळ सहा महिने चालते. उर्वरीत सहा तांत्रिक बिघाडाने बंद असते, पाणी पुरवठा बंद असला तरी पाणीपट्टी वसुली करण्याचे काम नगरपंचायत करीत आहे. ही नळ योजना सावलीकरांसाठी डोकेदुखी ठरली आहे. अशा गंभीर बाबीकडे पाणीपुरवठा विभागाने वेळीच लक्ष घालून फिल्टरची नळयोजना पूर्ववत सुरळीत सुरु करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.