प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:31 AM2021-08-28T04:31:18+5:302021-08-28T04:31:18+5:30

रत्नाकर चटप नांदा फाटा : कोरपना तालुक्यातील पाणीटंचाई घालवण्यासाठी सन १९९८ मध्ये ५६ कोटी रुपये खर्च करून प्रादेशिक पाणीपुरवठा ...

Gharghar to regional water supply scheme | प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला घरघर

प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला घरघर

Next

रत्नाकर चटप

नांदा फाटा : कोरपना तालुक्यातील पाणीटंचाई घालवण्यासाठी सन १९९८ मध्ये ५६ कोटी रुपये खर्च करून प्रादेशिक पाणीपुरवठा योजना अमलात आली. सुरुवातीला आठ ते दहा वर्षे योजना सुरळीत चालल्यानंतर काही ठिकाणी पाईपलाईन फुटली तर कुठे गावातील विद्युत बिले न भरल्यामुळे योजना मोडकळीस आल्याचे चित्र तालुक्यामध्ये दिसत आहे.

या योजनेंतर्गत कोरपना तालुक्यातील निमणी, सोनुर्ली, कोठोडा, कोडशी आदी ठिकाणी पाणीपुरवठा केंद्र तयार करण्यात आले आणि जवळपास ७० ते ८० गावांना नळयोजना जोडण्यात आली. परंतु योजना कार्यान्वित झाल्यानंतर नळ योजनेची दुरुस्ती न केल्यामुळे आज तालुक्यातील ३० ते ३२ गावांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे या गावांमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न पुढे येत आहे. निमनी केंद्रातून या योजनेंतर्गत केवळ चार गावांना पाणी पुरवठा होतो तर उर्वरित १४ गावातील नळयोजना बंद आहे. प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला पकडीगुड्डम धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सोनुर्ली पाणीपुरवठा केंद्रातून पिपर्डा वगळता अन्य गावांना पाणी पोहचत नाही.

कोरपना तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व इतर योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पुढाकार घेतला असून योजनेला गती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

बॉक्स

कोरपना शहरातील पाणीपुरवठा योजना थंडबस्त्यात

तालुक्याचे ठिकाण असलेल्या कोरपना शहरासाठी सन २०१५ मध्ये तीन कोटी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेच्या बांधकामासाठी एक कोटी रुपये देण्यात आले. मात्र अजूनही कोरपना शहरात पाणीपुरवठा योजना सुरू झालेली नाही. योजनेच्या मंजुरीला सहा वर्ष उलटले. परंतु बांधकामाला गती आल्याचे दिसत नाही. यातच गावातील काही विहिरी पाणीपुरवठा योजना सुरू होईल या उद्देशाने बुजवण्यात आल्या. त्यामुळे नागरिकांना बोअरवेल शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. हीच परिस्थिती गडचांदूर शहरातही दिसते. १२ कोटी रुपये खर्च करून पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले. मात्र चार ते पाच वर्षे उलटूनही योजना अद्याप सुरू झालेली नाही. गडचांदूरमध्ये काही वॉर्डांमध्ये उन्हाळ्यात मोठी पाणीटंचाई दिसून येते.

बॉक्स

काही ग्रामपंचायतीचा नळ योजनेसाठी पुढाकार

कोरपना तालुक्यात काही ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोग निधीतून स्वतः पाणीपुरवठ्यासाठी पुढाकार घेतलेला असून नळ योजनेची काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे गावातच नागरिकांना पाण्याची उत्तम व्यवस्था ग्रामपंचायत मार्फत करण्यात येत आहे.

Web Title: Gharghar to regional water supply scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.