घरकुलावरून भेजगाव येथील ग्रामसभा ठरली वादळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 10:43 PM2019-02-04T22:43:09+5:302019-02-04T22:43:44+5:30
मूल तालुक्यातील राजकीयदृष्टया अतिसंवेदनशिल समजल्या जाणाऱ्या भेजगाव येथील ग्रामसभा वादळी ठरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भेजगाव : मूल तालुक्यातील राजकीयदृष्टया अतिसंवेदनशिल समजल्या जाणाऱ्या भेजगाव येथील ग्रामसभा वादळी ठरली.
प्रजासत्ताकदिनी कोरमअभावी तहकूब झालेली ग्रामसभा सोमवारी पार पडली. भेजगाव ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणुका सप्टेबर महिन्यात पार पडल्या. ग्रामपंचायतीत कॉग्रेसच्या सरपंचासह तीन सदस्य तर भाजपाचे उपसरपंचासह आठ सदस्य आहेत. भाजपाच्या आठही सदस्यांनी खुर्चीवर न बसता नागरिकांध्ये बसणे पसंत केले. १२ जानेवारीला पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला होता. या वर्षातील पहिलीच ग्रामसभा ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना गाव समस्येच्या अनेक प्रश्नांची भडीमार करुन भांबावून सोडले. ग्रामसभा तब्बल चार तास चालली.
ग्रामसभेत खरे लाभार्थी घरकुलापासुन वंचित असून तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या राजकीय स्वार्थासाठी धनाढ्यांना घरकुलाचा लाभ मिळत असल्याची ओरड करण्यात आली. तर येसगाव येथे दारुविक्री सुरु आल्याने त्रस्त महिलांनी दारुबंदीसाठी विक्रेत्यांना शासकीय योजनांपासून वंचित ठेवण्याची मागणी केली. महिला आक्रमक झाल्याने दारुबंदीचा ठराव घेत अवैध दारु विक्रेत्यांना शासकीय योजनांपासून वंचित ठेवण्याचा ठराव घेण्यात आला.
भेजगावात पहिल्यांदाच पोलीस बंदोबस्तात ग्रामसभा पार पडली. यावेळी सरपंच अखिल गांगरेड्डीवार यांनी ग्रामसभेला मार्गदर्शन करीत शासकीेय योजनांची माहिती दिली. यावेळी उपसरपंच बबन लेनगुरे, ग्रामपंचायत सदस्य, पो.पा. एस.डी. गणवीर, अंगणवाडी सेविका वैशाली गांगरेड्डीवार, निमा शेंडे, कृपा चक्रनारायण उपस्थित होते.