घोडाझरी तलाव नहराच्या नांदेड, नवरगाव वितरिकेला भगदाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 05:00 AM2021-08-12T05:00:00+5:302021-08-12T05:00:35+5:30
घोडाझरी तलावाच्या मुख्य नहराला लागून असलेल्या नांदेड वितरिकेच्या धामणगाव चक जंगलाच्या मोरीवर मागील वर्षी पाटबंधारे विभागाने दुरुस्तीचे काम केले होते. वर्षभरातच त्या ठिकाणी मोठे भगदाड पडलेले आहे. पाणी नहराला न जाता धामणगाव चक येथील शेतकऱ्यांच्या शेतात जात आहे. त्यामुळे त्यांच्या शेतमालाची प्रचंड नुकसान होत आहे. तलावाच्या नवरगाव वितरिकेवरही मोठे भगदाड पडले आहे.
राजेश बारसागडे
लोकमत न्यूज नेटवर्क
सावरगाव : नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावाच्या मुख्य नहराला लागून असलेल्या नांदेड, नवरगाव या वितरिकांची मागील वर्षीच दुरुस्तीची कामे करण्यात आली. मात्र वर्ष पूर्ण होत नाही तोच पुन्हा या वितरिकांवर मोठे भगदाड पडले आहे. यामुळे शेकडो शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळणार की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे. या वितरिकेवरील दोन्ही भगदाड तातडीने बुजविण्यात यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. याबाबतचे निवेदन चंद्रपूर येथे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहे.
घोडाझरी तलावाच्या मुख्य नहराला लागून असलेल्या नांदेड वितरिकेच्या धामणगाव चक जंगलाच्या मोरीवर मागील वर्षी पाटबंधारे विभागाने दुरुस्तीचे काम केले होते. वर्षभरातच त्या ठिकाणी मोठे भगदाड पडलेले आहे. पाणी नहराला न जाता धामणगाव चक येथील शेतकऱ्यांच्या शेतात जात आहे. त्यामुळे त्यांच्या शेतमालाची प्रचंड नुकसान होत आहे. तलावाच्या नवरगाव वितरिकेवरही मोठे भगदाड पडले आहे. दरम्यान हे दोन्ही भगदाड घोडाझरी तलावाचे पाणी सोडण्याच्या अगोदर बुजविण्यात येऊन त्यांची योग्य ती मजबूत दुरुस्ती करण्यात यावी. नाहीतर पुढे पाणी जाणार नाही, अशी स्थिती आहे. यामुळे पुढील शिवारातील शेतकऱ्यांचे पीक पाण्याविना मरतील. इकडे अतिरिक्त पाणी झाल्यामुळे धामणगाव चकच्या शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची नासाळी होईल. मात्र अशी वेळ शेतकऱ्यांवर येऊ देऊ नये, अशी समस्त शेतकऱ्यांची मागणी आहे.
घोडाझरी तलावांतर्गत समस्यांचे निरसन करा
तलावाच्या मुख्य नहराचा तत्काळ उपसा व सफाई करण्यात यावी. नहराच्या विविध वितरिकांची दुरुस्ती करण्यात यावी. पाण्याअभावी शेतकऱ्यांचे पीक करपण्याच्या मार्गांवर असल्याने तलावाचे पाणी सोडण्यात यावे.
दरवर्षी १५ ऑगस्टला घोडाझरी नहराचे पाणी सोडले जाते. त्या अगोदर पाटबंधारे विभागाकडून वितरिकेची पाहणी केली जाते. पण या वर्षी तसे आढळून आले नाही. शेतकऱ्यांच्यावतीने वारंवार दुरुस्तीबाबत पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना फोनद्वारे माहिती दिल्या जात आहे. मात्र ते प्रतिसाद देत नाही.
-होमदेव मेश्राम,
माजी भाजपा तालुकाध्यक्ष,
वलनी ता. नागभीड
एकाच वर्षात केलेले नहर वितरिकेच्या दुरुस्तीचे काम वाहून जाते व तेथे मोठे भगदाड पडते. यावरून ते काम किती दर्जाचे झाले असावे. याची कल्पना येते. या बाबीची चौकशी होऊन संबंधित अभियंता, कंत्राटदार आदी दोषींवर कार्यवाही करण्यात यावी. त्वरित भगदाड बुजवावे.
-आनंदराव शेंडे,
सामाजिक कार्यकर्ते,
गोविंदपूर ता.नागभीड