घोडाझरी सर्वोत्तम अभयारण्य ठरेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 12:11 AM2018-02-02T00:11:10+5:302018-02-02T00:11:51+5:30
शासनाने अखेर घोडाझरीला अभयारण्याचा दर्जा बहाल केला आहे. घोडाझरीतील नैसर्गिक साधन संपत्ती, वन्यप्राण्यांचा वावर आणि नैसर्गिक सौंदर्य लक्षात घेता हे अभयारण्य महाराष्ट्रातील सर्वोत्तम अभयारण्य ठरेल, असा विश्वास या भागात व्यक्त होत आहे.
घनश्याम नवघडे।
ऑनलाईन लोकमत
नागभीड : शासनाने अखेर घोडाझरीला अभयारण्याचा दर्जा बहाल केला आहे. घोडाझरीतील नैसर्गिक साधन संपत्ती, वन्यप्राण्यांचा वावर आणि नैसर्गिक सौंदर्य लक्षात घेता हे अभयारण्य महाराष्ट्रातील सर्वोत्तम अभयारण्य ठरेल, असा विश्वास या भागात व्यक्त होत आहे. ‘लोकमत’नेही घोडाझरी अभयारण्य होणार, असे भाकित वर्तविले होते, हे विशेष.
ब्रह्मपुरी वन विभागातील एकूण १५९.५८३२ चौ.कि.मी क्षेत्र घोडाझरी अभयारण्यात समाविष्ट होणार आहे. या क्षेत्रामध्ये वन विभागातील नागभीड, तळोधी व चिमूर या तीन वन परिक्षेत्रातील पहाडी जमिनीचे व घोडाझरी तलावालगतचे वनक्षेत्र समाविष्ट राहणार आहे. या क्षेत्रामध्ये सात बहिणी डोंगर, मुक्ताई देवस्थान असणार आहे. प्रस्तावित अभयारण्याच्या पूर्व भागास नागपूर ते चंद्रपूर राज्य महामार्ग आहे. या वनक्षेत्रात पहाडी भाग अधिक असून वन्यजीवांच्या अधिवासासाठी हा भाग उपयुक्त आहे. या वनक्षेत्रात वाघ, बिबटे, रानगवा, चितळ, सांबर असे वन्यप्राणी आहेत.
भांगडियांच्या पाठपुराव्याला वनमंत्र्यांची साथ
घोडाझरी अभयारण्य व्हावे, अशी मागणी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी २०१५ मध्येच केली होती. तेव्हापासून ते यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत होते. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री असल्याने त्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली. आ. भांगडिया यांचा पाठपुरावा आणि वनमंत्री मुनगंटीवार यांची दखल, यामुळे हे नवे अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात उदयास आले आहे.