घोटेकर चंद्रपूरच्या महापौर घोषित

By admin | Published: May 1, 2017 12:34 AM2017-05-01T00:34:44+5:302017-05-01T00:34:44+5:30

चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आज रविवारी मनपा सभागृहात निवडणूक पार पडली.

Ghotek declared the Mayor of Chandrapur | घोटेकर चंद्रपूरच्या महापौर घोषित

घोटेकर चंद्रपूरच्या महापौर घोषित

Next

फुलझेले उपमहापौर : घोटेकर यांना ४२ तर रंजना यादव यांना २४ मते
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आज रविवारी मनपा सभागृहात निवडणूक पार पडली. यात भाजपाच्या अंजली घोटेकर यांना ४२ तर बसपाच्या रंजना यादव यांना २४ मते प्राप्त झाल्याने अंजली घोटेकर यांना महापौर म्हणून घोषित करण्यात आले. तर उपमहापौर पदासाठी भाजपाचे अनिल फुलझेले यांचे एकमेव नामांकन असल्याने त्यांना उपमहापौर म्हणून घोषित करण्यात आले.
चंद्रपूर मनपा निवडणुकीसाठी १९ एप्रिलला मतदान तर २१ एप्रिलला मतमोजणी करण्यात आली. यात भाजपाने ३६ जागांवर विजय मिळवित स्पष्ट बहुमत मिळविले होते. त्यानंतर महापौर पदासाठी भाजपाच्या वतीने अंजली घोटेकर आणि उपमहापौर पदासाठी अनिल फुलझेले यांचे नामांकन दाखल करण्यात आले होते. भाजपाला स्पष्ट बहुमत असल्याने अंजली घोटेकर याच चंद्रपूरच्या तिसऱ्या महापौर बनणार हे निश्चित झाले होते. मात्र घोटेकर यांच्यासोबतच बसपाच्या रंजना यादव यांनीही महापौर पदासाठी आपले नामांकन दाखल केल्याने प्रशासनाला निवडणूक घ्यावी लागली. यासाठी आज मनपाच्या सभागृहात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ वाजताच्या सुमारास भाजपाचे नवनिर्वाचित नगरसेवक व नगरसेविका फेटे धारण करून सभागृहात दाखल झाले. काँग्रेसचे १२ आणि इतर पक्षाचेही नगरसेवक सभागृहात दाखल झाले. त्यानंतर महापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी आशुतोष सलिल आणि मनपाचे आयुक्त संजय काकडे उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हात उंचावून निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांनी महापौर पदासाठी भाजपाच्या अंजली घोटेकर यांचे नाव घेताच ४२ सदस्यांनी आपले हात उंचावून घोटेकर यांना मतदान केले तर रंजना यादव यांना २४ जणांनी मतदान केले. मनसे आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी घोटेकर यांना मतदान केले, हे विशेष. ही मते बघता पिठासीन अधिकारी आशुतोष सलिल यांनी अंजली घोटेकर यांना महापौर घोषित केले.
उपमहापौर पदासाठी भाजपाचे अनिल फुलझेले यांचे एकमेव नामांकन असल्याने त्यांना निवडणूक न घेताच उपमहापौर म्हणून घोषित करण्यात आले.
महापौर व उपमहापौर यांची निवड झाल्यानंतर आ. नाना श्यामकुळे यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेपासून भाजपाच्या वतीने विजयी रॅली काढण्यात आली. या रॅलीत महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, सुभाष कासनगोट्टूवार, वसंत देशमुख, संदीप आवारी, माजी महापौर राखी कंचर्लावार, संजय कंचर्लावार, राहुल पावडे, राजेंद्र अडपेवार, शिला चव्हाण, शितल गुरनुले, वनिता डुकरे, वंदना जांभूळकर, रवी आसवानी, अंकूश सावसाकडे, जयश्री जुमडे, पुष्पा उराडे, राहुल घोटेकर, छबु वैरागडे, देवानंद वाढई, आशा आबोजवार, प्रशांत चौधरी, अनुराधा हजारे यांच्यासह भाजपाचे सर्व नगरसेवक व कार्यकर्ते सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)

स्थायी समिती
सदस्यांची निवड
मनपातील स्थायी समिती सदस्यांचीही आज निवड करण्यात आली. भाजपाच्या वतीने दहा, बसपाकडून दोन, काँग्रेसकडून तीन तर शहर विकास आघाडीकडून एका सदस्याचे नाव स्थायी समितीसाठी पाठविण्यात आले. यात १६ सदस्यांची निवड करण्यात आली.

शहराचा विकास साधणार
शहरातील नाल्यांची अवस्था वाईट आहे. मोकळ्या जागेतही घाणीचे साम्राज्य असते. त्यामुळे प्रथम याकडे प्राधान्याने लक्ष देऊन शहर सौंदयीकरणावर भर दिला जाईल. ना. सुधीर मुनगंटीवार, ना. हंसराज अहीर व आ. नाना श्यामकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विकास साधणार.
-अंजली घोटेकर,
नवनियुक्त महापौर, चंद्रपूर.

Web Title: Ghotek declared the Mayor of Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.