नगर परिषदेच्या मागणीसाठी घुग्घुस कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:23 AM2020-12-25T04:23:44+5:302020-12-25T04:23:44+5:30
घुग्घुस : घुग्घुस ग्रामपंचायतला नगर परिषदेचा दर्जा मिळावा, यासाठी सर्वपक्षीय नगर परिषद संघर्ष समितीने केलेल्या घोषणेनुसार गुरुवारी स्वयंपूर्तीने ...
घुग्घुस : घुग्घुस ग्रामपंचायतला नगर परिषदेचा दर्जा मिळावा, यासाठी सर्वपक्षीय नगर परिषद संघर्ष समितीने केलेल्या घोषणेनुसार गुरुवारी स्वयंपूर्तीने आपापली प्रतिष्ठाने बंद ठेऊन मागणीला समर्थन दिले.
गांधी चौकात सर्वपक्षीय नगर परिषद स्थापना समितीच्या नेत्यांनी घुग्घुस नगरपरिषद झालीच पाहिजे, अश्या घोषणा दिल्या व घुग्घुस नगर परिषदेच्या मागणीकरिता पुढे अधिक तिव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
बुधवारी रात्री घुग्घुस बंदचे आवाहन केले होते. गुरुवारी सकाळी घुग्घुस बंद यशस्वी व्हावे यासाठी दुचाकी रॅली काढली. दरम्यान गांधी चौकात एकत्रित येऊन नगर परिषद झालीच पाहिजे, असा घोषणा दिल्या.
विशेषतः आज सर्वपक्षीयानी आपापल्या पक्षाच्या व सर्वपक्षीय
समितीचे लेटरपॅडवर ग्रामपंचायतची निवडणूक रद्द करा व घुग्घुस नगर परिषदेची घोषणा करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री, ग्राम विकास व नगर विकास मंत्री यांना पाठविण्यात आले. तथा जिल्हयाचे पालकमंत्री, आमदार ,खासदार यांना सर्वपक्षीय नेत्यांच्या समावेश असलेल्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.
बुधवारपासून ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली.
निवडणूक लढविणाऱ्या इच्छूकानी आवश्यक असलेले कागदपत्र ग्रामपंचायतकडून मिळविले.त्यांनी ग्रा.प.कार्यालयात परत करावे, असे केलेल्या आवाहनानुसार त्यांनी ग्रा.प.ला परत केले. नगर परिषद निर्मिती संदर्भात वर्तमान जि.प. महिला व बाल समिती सभापती तथा पं.स.चे वर्तमान उपसभापती तथा सदस्यांनी आपला कार्यकाळ शिल्लक असला तरी घुग्घुस नगर परिषद करण्याबाबत आपला सकारात्मक अभिप्राय दिला आहे.