कोळसा खाणींमध्ये विद्यार्थिनींनाही होता येणार मायनिंग अभियंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 08:55 PM2020-09-11T20:55:46+5:302020-09-11T20:56:24+5:30
२०२०-२१ शैक्षणिक सत्रापासून मायनिंग अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणार असल्याने विद्यार्थिनींना आता मायनिंग अभियंता होण्याची संधी मिळणार आहे.
राजेश मडावी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : संधी मिळताच महिला जीवनाच्या विविध क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवत असतानाही अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या अखत्यारित संस्थांमधील मायनिंग पदविका अभ्यासक्रमाला आजपर्यंत प्रवेश दिला जात नव्हता. मात्र, २०२०-२१ शैक्षणिक सत्रापासून मायनिंग अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणार असल्याने विद्यार्थिनींना आता मायनिंग अभियंता होण्याची संधी मिळणार आहे. राज्याच्या तंत्र शिक्षण संचालनालयाने यासंदर्भात मंगळवारी परिपत्रक जारी केल्याने राज्यातील हजारो विद्यार्थिनींच्या प्रगतीचे मार्ग खुले झाले आहेत.
अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेची स्थापना झाल्यापासून अखत्यारित तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये मायनिंग, मायनिंग सर्व्हे, मायनिंग इंजिनिअरींग अभ्यासक्रम शिकविले जातात. मात्र, पदविका व पदवी स्तरावरील अभ्यासक्रमात प्रवेशाचे मार्ग विद्यार्थिनींसाठी बंद ठेवण्यात आले होते. मायनिंग अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर वेकोलि खाणींमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. त्यामुळे मायनिंग पदवी प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. या अभ्याक्रमतंर्गत विविध कोळसा व तत्सम खाणींमध्ये क्षेत्रकार्य करावे लागते. हे क्षेत्रकार्य अत्यंत खडतर असल्याचा तर्क लावून विद्यार्थिनींना प्रवेश नाकारण्यात आला. परिणामी, विद्यार्थिनींना मायनिंग अभियंता होण्याच्या स्वप्नांना मुरळ घालावी लागत होती.
'फिमेल कॅन्डेड आर नॉट इलिजीबल' अट वगळली
२०२०-२१ शैक्षणिक सत्रातील तंत्रशिक्षण संचालनालयाच्या पदविका अभ्यासक्रमाच्या माहिती पुस्तिकेतील ४-सी जनरल नोटमधील मुद्दा क्रमांक ३ नुसार फिमेल कॅन्डेड आर नॉट इलिजीबल फॉर ऍडमिशन टू मायनिंग अँड माईन सर्वे, मायनिंग इंजिनिअरींग कोर्स असे नमुद करण्यात आले होते. मात्र, हा उल्लेख रद्द करून महिला उमेदवारांना मायनिंग व तत्सम अभ्यासक्रमासाठी पात्र असल्याचे परिपत्रक राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने जारी केले आहे.
बीआयटीच्या प्रयत्नांची फलश्रुती
चंद्रपूर जिल्हा कोळसा खाणींसाठी प्रसिद्ध आहे. वेकोलिमुळे दरवर्षी नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. मात्र, मायनिंग पदविकेसाठी विद्यार्थिनींना प्रवेश नसल्याने बल्लारपूर इन्स्टिट्युट ऑफ टेक्नालॉजी (बीआयटी) बामणीचे संस्थाध्यक्ष अँड. बाबासाहेब वासाडे, संचालक संजय वासाडे, प्राचार्य श्रीकांत गोजे यांनी राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. विद्यार्थिनींना या सत्रापासून मायनिंग पदविकेला प्रवेश मिळणे ही बीआयटीच्या प्रयत्नांचीच फलश्रुती होय.
प्रवेशासाठी २१ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मायनिंग पदविका प्रवेशासाठी १० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, या अभ्यासक्रमाला प्रथमच विद्यार्थिनींनी प्रवेश देण्याचा निर्णय तंत्रशिक्षण विभागाने घेतला. त्यामुळे प्रवेश घेण्याकरिता २१ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
मायनिंग व तत्सम पदविका प्रवेशासाठी महिला उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या अखत्यारित सर्व संस्थांना या शैक्षणिक सत्रापासूनच हा निर्णय लागू करण्यात आला आहे.
-डॉ. अभय वाघ, संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई